कोल्हापूर | जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पावसाची रिपरीप (Kolhapur Rain Update) सुरू असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 इंचाने वाढ झाली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी दुपारी 2 वाजेपर्यंत 40 फूट 7 इंच आहे. जी सकाळी 9 वाजेपर्यंत 40 फूट 5 इंचावर स्थिर होती. असं असलं तरी राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद झाल्याने कोल्हापूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.
Kolhapur Rain Update – राधानगरी धरणाचे काल 26 जुलै 2023 रोजी 5 स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर भोगावती नदीतून 8540 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. हा पाण्याचा प्रवाह पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू होता, त्यामुळे कोल्हापूरात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढण्याची भिती व्यक्त केली जात होती. दरम्यान यातील एक दरवाजा बंद झाल्याने 1400 क्युसेक्स विसर्ग कमी झाला आहे. सध्या धरणातून 7112 क्युसेक इतका विसर्ग सूरू असून 4,5,6 आणि 7 गेट सुरू आहेत.
काल राधानगरी धरणातून सुटलेल्या पाण्याच्या पातळीचे विविध बंधाऱ्यावर मोजमाप सूरू आहे. आज 27 जुलै 2023 रोजी सकाळी 8 पर्यंत तारळे बंधारा येते 6 फूट, शिरगाव बंधारा येथे 9 फूट आणि राशिवडे बंधारा येथे 2 फूट 6 इंच पाणी पातळी वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील घाट माथा तसेच परिसरात सर्वच ठिकाणी पाऊस सूरू असल्याने एकूण 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे पाऊस सध्यातरी सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे. 29 तारखेनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असून तेव्हापासून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
अलमट्टीतून पुन्हा विसर्ग वाढवला
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध धरणांतून होत असलेला विसर्ग लक्षात घेऊन पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग गुरुवारी अकरा वाजल्यापासून 1 लाख 25 हजार क्युसेक वरून दीड लाख क्युसेक करण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा महापूराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.