News

Kolhapur Rain Update: गगनबावड्यात अतिमुसळधार; सर्व नद्यांना पूर, सलग चौथ्या दिवशी कळे-गगनबावडा राष्ट्रीय मार्ग बंद!

गगनबावड्यात गेल्या चोवीस तासांत 136 मिलीमिटर, कोदे धरणक्षेत्रात 137 मिलीमिटर तर कुंभी धरणक्षेत्रात 63 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. कुंभी धरण क्षमतेच्या 71 टक्के भरले आहे.

गगनबावडा | महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या गगनबावडा तालुक्यात (Kolhapur Rain Update) गेल्या चोवीस तासांत 136 मिलीमिटर पावसाची नोंद झालीय. गेल्या आठवडाभर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून आज बुधवारी देखील दुपारनंतर अतिमुसळधार पावसाने तालुक्याला झोडपून काढले. तालुक्यासह घाट माथ्यावर अतिवृष्टी झाल्याने कुंभी नदीच्या पुर पातळीत मोठी वाढ झाली आहे.

तालुक्यात पावसाचा जोर बुधवारी सकाळी किंचितसा कमी झाल्याचे दिसत होते. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढल्याने पूरपरिस्थती जैसे थे राहिली. घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात देखील जोराचा पाऊस झाल्याने नद्यांची पाणीपातळी वाढल्याचे दिसून आले. तालुक्यातील गगनबावडा, बोरबेट, वेसरफ, कोदे, बावेली इत्यादी ठिकाणी जोराचा पाऊस झाला.

पावसाचा जोर कायम राहिल्याने बुधवारी दिवसभर किरवे-लोंघे दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी राहिले, त्याचबरोबर मांडुकली, खोकुर्ले येथे देखील रस्त्यावर पाणी आल्याने सलग चौथ्या दिवशीही कळे-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद राहिली.

तालुक्यातील सर्व नद्या पात्राबाहेर – Kolhapur Rain Update

गगनबावडा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंभी, धामणी, सरस्वती व रुपणी नद्यांचे पाणी पावसाचा जोर कायम राहिल्याने पात्राबाहेर येवून शेतशिवारात शिरले आहे. यामुळे कुंभी नदीवरील मांडुकली, शेणवडे, वेतवडे हे बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. तर दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने धामणी नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

तालुक्यात 3 ठिकाणी झालेल्या पडझडीत 48 हजारांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील साळवण येथील झाड उन्मळून पडले. कातळी-तळये दरम्यान मोठे झाड उन्मळून पडले. विजेचे दोन खांब मोडले. गगनबावडा जवळील पेट्रोल पंपाजवळील विजेचा खांब पडला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कसरत करत सायंकाळी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला.

भरपावसात महावितरणच्या कर्मचाऱ्यांची सेवा

गगनबावडा-बोरबेट ते धुंदवडे ही महावितरणची लाईन जंगलातून जाते. जोराचा वारा व मुसळधार पावसामुळे झाडे पडणे, पोल कोसळणे हे दररोज सुरु आहे. मात्र गगनबावडा महावितरणचे कर्मचारी भर पावसातही दुरुस्ती करुन दुर्गम भागातील गावांना विजसेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Back to top button