कोल्हापूर | कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील (Kolhapur-Gaganbawda Road) बालिंगा पूल धोकादायक स्थितीत असल्याने आज (ता. 25) पासून पुढील आदेश येईपर्यंत वाहतूकीसाठी बंद करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेत.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले आहे. बालिंगा पूल खूप जुना असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे पर्यायी पुलाचे काम सुरू करण्यात येणार होते, परंतु अद्यापी पर्यायी पुलाचे काम सुरू झालेले नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच जुन्या पुलावरून ये-जा करावी लागते.
दरम्यान, सध्या असणाऱ्या पुलाला पाणी लागल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी कोणतीहा धोका न पत्करता जिल्हा प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी सर्वच वाहनांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Kolhapur News : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरू, बालिंगा पुलावर केवळ सुरक्षेसाठी बॅरिकेट्स
कोल्हापूर (24 जुलै) | कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात देखील अतिवृष्टी सुरू असून जिल्ह्यातील बहुतांशी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी जिल्ह्यात पूरस्थिती आहे.
काही काळ बालिंगा पूलावरील वाहतूक बंदच्या बातमीने गोंधळ
कोल्हापूर (24 जुलै) | जिल्ह्यातील भोगावती नदीवरील बालिंगा पूल जुना आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा मार्ग बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची पूर्वतयारी म्हणून या विभागाच्या अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांनी परिस्थितीचा आढावा न घेताच मुख्य रस्त्यावर साबळेवाडी फाटा आणि कोल्हापूर कडून बालिंगा पुलाच्या दिशेने महादेव मंदिर येथे बॅरिकेट्स लावून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये काहीकाळ वादावादी देखील झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर बॅरिकेट्च्या बाजूने वाहनधारकांनी ये-जा सुरू केली. अर्ध्या तासानंतर लावलेली बॅरिकेट्स हटवून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भोगावती नदीवर बालिंगा गावच्या हद्दीत असणाऱा हा पूल खूप जुना आहे. या पुलावर कोल्हापूरातील करवीर, पन्हाळा गगनबावडा या तालुक्यातील लोकांचे दळणवळण होत असते. याशिवाय कोल्हापूरला कोकणला जोडणारा हा मार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक होत असते.
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 24 राज्य मार्ग असून यामधील 9 मार्ग बंद पडले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 122 जिल्हा मार्ग आहेत. त्यामधील 20 मार्ग बंद पडले आहेत. यामध्ये वैभववाडी-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी पाणी असल्याने हा मार्गही बंद आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेकडेकडील एकूण 201 मार्गांपैकी 12 मार्ग बंद आहेत. ग्रामीण भागातील 1997 मार्गांपैकी 18 मार्ग बंद आहेत. त्यामुळे 2198 मार्गांपैकी 30 मार्ग बंद आहेत. या सर्व मार्गांवर पर्यायी मार्गाने वाहतूक बंद आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 14 मार्गावरील एसटी सेवा बंद
- कोल्हापूर ते गगनबावडा
- रंकाळा ते पडसाळी
- रंकाळा ते आरळी
- रंकाळा ते चौकी
- रंकाळा ते गगनबावडा
- चंदगड ते गडहिंग्लज
- गडहिंग्लज ते हाजगोळी
- गडहिंग्लज ते नेसरी
- चंदगड ते बेळगाव
- चंदगड ते हेरा
- चंदगड ते कानूर
- चंदगड ते बुजवडे
- चंदगड ते कोल्हापूर
- कागल ते पणजी
‘या’ नद्यांवरील बंधारे पाण्याखाली
- पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
- भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
- कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे
- हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी
- घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
- वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली, गारगोटी, म्हसवे, सुक्याचीवाडी, शेणगाव
- कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली, सांगशी, असळज
- वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची
- कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे, सरुड पाटणे,
- धामणी नदी : सुळे, पनोरे, आंबडे
- तुळशी नदी : बीड
- ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाही, काकरे, न्हावेली, कोवाड
- दुधगंगा नदी : दत्तवाडी, सुळकूड, सिद्धनेर्ली, बाचणी