News

करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

कोल्हापूर | आमदार पी.एन. पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी.एन. पाटील यांची ओळख राहिली. पी. एन. पाटील यांच्यावर रविवारी सकाळी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 

पी. एन. पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी

दरम्यान, जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज (23 मे) सकाळी 10 वाजता आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव मुळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येणार आहे. सडोली खालसामध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

बाथरुममध्ये चक्कर येऊन पडल्याने मेंदूत रक्तस्त्राव 

आमदार पी. एन. पाटील रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घरी चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. यानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने आधारमध्ये दाखल केल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यांच्या मेंदूची सूज कायम होती. त्यामुळे तुलनेत प्रकृती स्थिर असली तरी गंभीर होती. त्यांच्या दिर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना सुरु होती. गोकुळ दूध संघाकडूनही त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती. मुंबई प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. सुहास बराले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पी. एन. पाटील यांच्यावर उपचार सुरु होते

Back to top button