कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात (Kolhapur North Vidhan sabha Election Result 2024) महायुतीचे उमेदवार राजेश क्षिरसागर यांनी आमदारकी पुन्हा खेचून घेतली आहे. त्यांनी महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. दोन अधिकृत उमेदवार देऊनही उमेदवारच नाही, अशी स्थिती झालेल्या काँग्रेसला कोल्हापूर उत्तरमध्ये यामुळे मोठा झटका बसला आहे.
276 कोल्हापूर उत्तर
23 फेरी पैकी 23 फेरी अखेर राजेश क्षीरसागर याना 29310 ची आघाडी
(EVM मतमोजणी पूर्ण)
राजेश क्षीरसागर विजयी
उमेदवारी जाहीर होण्यापासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ राज्यात प्रसिध्दीच्या झोतात आला होता. याठिकाणी महायुतीकडून राजेश क्षिरसागर यांची उमेदवारी नक्की असताना महाडिक पुत्र कृष्णराज यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याने मोठी चर्चा झाली होती.
दुसरीकडे महाविकास आघाडीने ऐनवेळी राजेश लाटकरांची उमेदवारी बदलून मधुरिमा राजेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नाराज झालेल्या लाटकरांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला होता. त्यांनी माघार न घेतल्याने मधुरिमाराजेंनी शेवटच्या क्षणी आपला अर्ज मागे घेत लाटकरांना पाठिंबा दिला होता.
कोल्हापूर उत्तरमध्ये पहिल्या दहा ते बारा फेऱ्यांमध्ये राजेश क्षिरसागर पिछाडीवर होते. त्यानंतर मात्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राहिलेल्या राजेश क्षीरसागर यांनी विजय खेचून आणला आहे. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात तगडी झुंज दिली. मात्र, त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे.
कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर यांची फाईट राज्यात चर्चेचा विषय होती. अखेरच्या टप्प्यामध्ये प्रियांका गांधी यांची सभा सुद्धा गांधी मैदानामध्ये पार पडली होती. त्यामुळे या निकालाकडे निकालाकडे राज्याचे लक्ष होतं. मात्र या ठिकाणी क्षीरसागर यांना बाजी मारण्यामध्ये यश मिळालं आहे.
दरम्यान शिरोळ मतदार संघात देखील महायुती पुरस्कृत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बाजी मारली असून तिथेही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर करवीर मध्ये महायुतीच्या चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसच्या राहुल पाटील यांना पराभवाची धूळ चारत आमदारकी खेचून घेतली आहे.