Kolhapur News: प्रशासनाचे नियम पायदळी तुडवून रस्त्यात मांडव उभारणाऱ्या ‘अशा’ मंडळांवर कारवाई होणार का?

0
72
Kolhapur News
Kolhapur News

कोल्हापूर | सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने उत्सवाच्या तयारीला लागला आहे. सार्वजनिक मंडळे सुध्दा जोमाने तयारीला लागली आहेत. मात्र काही सार्वजनिक मंडळे प्रशासनाने घालुन दिलेले नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहे. अशा गोष्टींकडे प्रशासनाची देखील डोळेझाक होत असून सर्वसामान्यांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

काही सार्वजनिक मंडळे प्रशासनाने घालून दिलेले नियम तंतोतंत पाळतात. मात्र काही मंडळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांऐवजी ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे उत्सव साजरा करण्यात मग्न असतात. कोल्हापूरात अशी बरीच मंडळे असून, आता उदाहरण द्यायचं झालं तर लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलच्या शेजारून एक रस्ता शाहुपुरी कुंभार गल्लीत जातो. मार्केट एरिया असल्याने तिथे नेहमीच गजबज असते.

नेहमीप्रमाणे सहकुटुंब मार्केट मधून खरेदी करुन बाप्पाची मुर्ती ठरवायला जाण्यासाठी कुंभार गल्ली कडे जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. मात्र नावात ‘फाईट’ असणाऱ्या एका मंडळाने याठिकाणी रस्त्याच्या कॉर्नरवरच भला मोठा मांडव घातला आहे. जो निम्मा वाहतुकीच्या रस्त्यावर आला आहे. दुसरे म्हणजे गाडी जाण्यासाठी जो रस्ता सोडला आहे, तिथे चेंबर वर आलेले आहे. त्यामुळे तिथुन वाहन चालवणे धोकादायक आहे. चुकून एखाद्या गाडीचा मांडवाला धक्का लागला किंवा काही अनर्थ घडला तर याची जबाबदारी हे मंडळ घेणार आहे का? हा प्रश्न आहे.

प्रशासनाने नियम घालुन परवानगी दिली तरी, घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे गरजेचे आहे. हा रोड कुंभार गल्लीत जातो त्यामुळे दरवर्षी याच रोड वरुन इतर घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्ती जात असतात. संभाजी नगरचा मानाचा गणपती सुध्दा इथुनच जात असतो. मात्र या ग्रुपने याचा कोणताही विचार न करता रस्त्यावर मांडव घालून अडथळा निर्माण केल्याचे दिसत आहे.

अशा मंडळांना काहीतरी अनर्थ घडला की जाग येते. हे केवळ एक उदाहरण आहे, अशी अनेक मंडळे कोल्हापूरात आहेत. जी नियमबाह्य उत्सव साजरे करतात. प्रशासनाने कारवाई करण्याचे धाडस दाखवले तरी एखादा राजकीय पुढारी स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी प्रशासनालाच दमदाटी करत मंडळांची पाठराखण करतो. त्यामुळे प्रशासनाने अशा नियमबाह्य कृती करणाऱ्या मंडळाना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मंडळाच्या मांडवांच्या जागेची पाहणी करणे, परवानगी देताना त्या जागेचा फोटो घेणे, त्यानुसार मांडव उभारले आहेत की अवास्तव जागा अडवण्यात आली आहे याची पाहणी करणे. यासाठी उत्सवकाळात प्रशासनातील जबाबदार माणसे नेमून त्या त्या भागातील मंडळांना भेटी देऊन याची पाहणी करणे आवश्यक आहे. राजकीय दबाव झुगारून अशी कारवाई केल्यास सर्वसामान्य कोल्हापूरकरांना उत्सवकाळात नक्कीच दिलासा मिळेल.