कोल्हापूर: आईच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने सख्ख्या बहिण भावाची राजाराम तलावात उडी घेत आत्महत्या | Kolhapur News
कोल्हापूर | आईच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने बहिण भावाने राजाराम तलावात उडी टाकून जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 15 ऑगस्ट रोजी गुरुवारी हा प्रकार समोर आला. भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय ६१ वर्षे) आणि भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (वय ५७ वर्षे) अशी तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या बहिण भावाची नावे आहेत. ही घटना साऱ्यांच्याच मनाला चटका लावणारी ठरली.
राजारामपुरी पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘भूषण आणि भाग्यश्री कुलकर्णी हे भाऊ-बहिण जुनी मोरे कॉलनी नाळे कॉलनी येथे राहावायस होते. अडीच महिन्यापूर्वी त्यांच्या आई पद्मजा यांचे निधन झाले. आईच्या निधनानंतर हे दोघे बहिण-भाऊ नैराश्यात असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. आईच्या निधनाचा विरह त्या भावडांना सहन झाला नाही. नैराश्यातून त्या दोघांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी, सकाळी त्या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. नागरिकांनी त्यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये त्या भावडांची नावे आहेत. आईच्या निधनामुळे आलेले नैराश्य व विरह सहन न झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटल्याचे समजते. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेह तपासणीसाठी सीपीआरला पाठविले.’
पतीच्या निधनानंतर पत्नीची पंचगंगा नदीत उडी घेत आत्महत्या
दरम्यान, आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली असून संभाजीनगर परिसरातील सीमा हरिश ढाले यांनी (15 ऑगस्ट) सकाळी राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. तीन दिवसांपूर्वी त्यांचे पती हरीश विष्णू ढाले यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूच्या विरहातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आत्महत्येची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.