कोल्हापूर: सरवडेत पार्किंग केलेल्या चारचाकींना अज्ञात वाहनाची धडक, दोन कारचे नुकसान | Kolhapur News
कोल्हापूर | सरवडे (निपाणी-फोंडा राज्यमार्ग) येथे घरासमोर पार्क केलेल्या दोन वाहनांना मंगळवारी मध्यरात्री अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात अल्टो (एमएच ४-१९ बीके ९०५९) आणि स्विफ्ट (एमएच ०९ एफजे २४४४) या दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मात्र प्रत्यक्षदर्शी उपलब्ध नसल्याने अज्ञात वाहनाविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. वाहनांचे मालक संजय कृष्णा एकल आणि युवराज कृष्णा एकल यांनी अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
अपघातस्थळी आढळलेल्या टायरच्या खुणा आणि तुटलेल्या भागांवरून अज्ञात वाहन वेगाने असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राधानगरी पोलीस घटनास्थळी भेट दिली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच निष्कर्ष हाती येतील, असे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितले.