News

Kolhapur News: मुस्लिम मतदारांची नवीन नावे मतदार यादीत नकोत; शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या \’त्या\’ ठरावाने खळबळ, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..

कोल्हापूर | Kolhapur News – करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावात मुस्लिम मतदारांची नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याचा विचित्र ठराव ग्रामसभेने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठरावाची कॉपी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गावातील काही तरुणांनीच असा ठराव करायला भाग पाडल्याचं सांगितल जात असून यावर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शिंगणापूर ग्रामसभेने केलेला हा ठराव सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गावच्या सरपंचांनी या प्रकरणी सारवासारव करत मुस्लीम समाजाची जाहीर माफी मागत भविष्यात अशी चूक होणार नाही, तसेच हे पत्र दिशाभूल करणारे असून, बांगलादेशी अल्पसंख्याकांबाबत हा ठराव करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान हा वादग्रस्त ठराव अधिकृत नसल्याचं ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद स्तरावर गटविकास अधिकारी आणि करवीर तहसीलदारांना देण्यात आले आहेत. तर या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे.

\"\"

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला वादग्रस्त ठराव

विषय क्र. 2 अल्पसंख्याक (मुस्लीम ) मतदान नोंदणी बाबत..

\’मौजे शिंगणापूर गावच्या गावसभेत वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व शिंगणापूर गावच्या हद्दीतील नवीन मतदार नोंदणी करतेवेळी नवीन येणाऱ्या अल्पसंख्याक (मुस्लीम) यांची नवीन मतदान नोंदणीत नावे समाविष्ट करणेत येवू नयेत असे सर्वानुमते ठरले.

तसेच ज्या ज्या वेळी नवीन मतदार यादी प्रसिद्ध होईल तेव्हा नवीन अल्पसंख्याक (Muslim) यांची नावे नोंद झालेचे निदर्शनास आल्यास त्यावर ग्रामपंचायत मार्फत हरकती घेवून सदरची नावे कमी करणेत यावीत असे हि सर्वानुमते ठरले त्यास आजची गावसभा सर्वानुमते मंजुरी देत आहे.\’

सदर ठरावावर लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांची सही आहे. तर ठरावाला प्रमोद मस्कर सुचक असून अमर पाटील यांनी अनुमोदन केले आहे.

शिंगणापूरच्या सरपंच, ग्रामसेवकांवर फौजदारी दाखल करून ग्रामपंचायत बरखास्त करा – मोहोमेडन एज्युकेशन सोसायटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ग्रामपंचायत मौजे शिंगणापूरचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांनी मुस्लिम मतदान नोंदणी न करणे याविषयी केलेला ठराव घटनाबाह्य आणि धार्मिक तेढ, भेदभाव निर्माण करणारा आहे. त्यामुळे सर्व संबंधितांवर फौजदारी दाखल करावी. ग्रामपंचायत बरखास्त करावी, अशी मागणी दि मोहोमेडन एज्युकेशन सोसायटीने केली. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले आहे.

भारतीय राज्य घटनेतील कलम ३२६ नुसार १८ वर्षांवरील भारतातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. असे असतानाही ग्रामपंचायत शिंगणापूरच्या गावसभेमध्ये केलेला ठराव म्हणजे मुस्लिम समाजावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार आहे. हे कृत्य घटनाबाह्य तसेच धार्मिक भेदभाव करणारे आहे. ही एक गंभीर बाब आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाच्या राज्यघटनेला तडा देणारा आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूरनगरीत जेथे समता, समानता, धर्मनिरपेक्षता, बंधुभाव यांना महत्त्व दिले जाते. तेथे धार्मिक विद्वेश तसेच धर्माच्या आधारावर मतदानाचा अधिकार काढून घेण्याविषयीचा ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. ग्रामसेवक हा सरकारी कर्मचारी असताना देखील अशा घटनाबाह्य कृत्यात सहभागी झाल्याने त्याला निलंबित करण्याची कारवाई करावी. शिंगणापूर ग्रामपंचायत बरखास्त करावी. तत्काळ व कठोर पावले उचलण्याची विनंती या निवेदनाव्दारे दि मोहोमेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर आणि प्रशासक कादर मलबारी यांनी केली आहे.

Back to top button