जमावबंदी आदेश! केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश बंदी | Keshavrao Bhosale Theatre
कोल्हापूर | कोल्हापूर शहरामधील केशवराव भोसले नाट्यगृह (Keshavrao Bhosale Theatre) येथे दिनांक ०८/०८/२०२४ रोजी आग लागलेली असलेने त्या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणेची, मानवी जिवितास, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका होण्याची शक्यता असलेने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करणे आवश्यक असलेचे पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा पोलीस स्टेशन, ता. करवीर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
त्यामुळे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान असलेल्या अधिकारास अनुसरून दिनांक ०९/०८/२०२४ ते दिनांक २४/०८/२०२४ पर्यंत कोल्हापूर शहरामधील केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथील सर्व दिशेला १०० मीटर अंतरावरील परिसरामध्ये कोणत्याही अशासकीय व्यक्तीस प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या आपत्ती कालावधीमध्ये अग्निशामक यंत्रणा, पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी व आपत्ती संदर्भातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना सदर परिसरामध्ये कार्यरत राहून आपत्ती विषयक कामकाज करणेस मुभा राहील.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कायदेशीर कार्यवाही करणेत येईल असे आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर यांनी लागू केले आहेत.