सीपीआर मधील भ्रष्टाचाराची मालिका सुरूच, बोगस दराने पाच कोटींचा साहित्य पुरवठा | Kolhapur News
कोल्हापूर | सीपीआरमधील भ्रष्टाचाराची मालिका संपण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालयं. आता शासनाच्याच रुग्णालयाचे बोगस दर करारपत्र दाखवून त्याआधारे तब्बल ४ कोटी ८७ लाख ३० हजार ५०० रुपयांच्या साहित्याचा घोटाळा करण्यात आलायं. येथील व्ही. एस. एंटरप्रायजेसने हा औषध पुरवठा केल्याचे स्पष्ट झालयं.
Kolhapur News: अन्न आणि औषध प्रशासनाच्या दुसऱ्या नावच्या प्रमाणपत्राच्या आधारे फसवणूक करून सीपीआरला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे आहे. याप्रकरणात साहित्य पुरवणाऱ्या न्यूटन कंपनीच्या अजिंक्य पाटील याचा कारनामा उघड झाला होता. तसाच प्रकार पुन्हा उघडकीस आल्याने येथील सीपीआरचा भ्रष्ट कारभारावर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या प्रकरणाचा गांभिर्याने विचार केल्यास, संपूर्ण प्रकरणात सीपीआरमधील खरेदी प्रक्रियेत सहभागी असलेले मोठे डाॅक्टर्स, त्यांना सहकार्य करणारे खरेदी प्रक्रियेतील लिपिक आणि अकौटंटवर्गीय कर्मचारी यांचे संगनमत कसे असते याचे उत्तम उदाहरण आहे. या सर्वांच्या जोरावर कंत्राटदार मंडळी कशा पद्धतीने शासनाच्या निधीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतात हे यातून स्पष्ट दिसून येत आहे.
या सर्व प्रक्रियेला ऑक्टोबर २०२२ पासून सुरुवात झाल्याचे दिसत असून १४ फेब्रुवारी २०२३ ला संबंधित ठेकेदाराला सर्व बिल अदा करण्यात आली आहेत. या चार महिन्यांत प्रशासनाने कसलीही खातरजमा न करता कशा पद्धतीने कोणाच्या तरी फायद्यासाठी काम केलयं हे या प्रकरणावरून दिसून येतयं.
४ कोटी ८७ लाखाच्या साहित्यासोबत इतर सर्जिकल साहित्यासाठी असा एकूण १२ कोटी १९ लाख ५० हजार रुपयांचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे सादर करण्यात आला होता. यामध्ये ड्रेसिंगसाठी लागणाऱ्या पॅडच्या १० हजार बॅाक्सचा समावेश होता. या प्रस्तावाला डिसेंबर २०२२ मध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाने तांत्रिक मान्यता दिली. यामध्ये ड्रेसिंग पॅडव्यतिरिक्त आणखी चार द्रव औषधांचा समावेश होता.
यासाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यात यावा, असे तांत्रिक मान्यता देताना विभागाने नमूद केले होते. त्यानंतर डिसेंबर २०२२, जानेवारी २०२३ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये यासाठीच्या प्रशासकीय मान्यता जिल्हा नियोजन समितीकडून मिळाल्या होत्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉ. प्रदीप दीक्षित यांच्या कार्यकाळात या मान्याता देण्यात आल्या होत्या.