News

कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार? रेल्वेमंत्री वैष्णव यांनी काय सांगितले? वाचा | Kolhapur-Mumbai Vande Bharat Express

कोल्हापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या जनतेला लोकसभा निवडणूकी दरम्यान कोल्हापूरातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. कोल्हापूरकरांना दिलेल्या या आश्वसनाची लवकरात लवकर पुर्तता व्हावी अशी मागणी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

मुंबई-कोल्हापूर मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, वळिवडे आणि रुकडी या स्थानकांवर रेल्वेचा थांबा पूर्ववत सुरू करावा, यासह अन्य मागण्या खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्या आहेत. यावेळी दिलेल्या निवेदनात महाडिक यांनी म्हटले आहे, कोल्हापूर-मुंबई या मार्गावर प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या नेहमी प्रवाशांनी भरलेल्या असतात. अशावेळी कोल्हापूर-मुंबई मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी.

तसेच कोल्हापूर स्थानकावरून सुटणाऱ्या बहुतेक सर्व रेल्वेगाड्या वळिवडे आणि रुकडी या स्थानकांवर थांबत होत्‍या. मात्र, कोरोना काळात हे थांबे रद्द करण्यात आले. ते पूर्ववत सुरू करावेत. रेल्वेचा पुणे विभाग मनमाडपर्यंत विस्तारित केल्यास कोल्हापूरहून शिर्डी साईनगरपर्यंत एखादी विशेष रेल्वे सुरू करता येईल. त्यातून हजारो भाविकांची मोठी सोई होईल. सध्या मिरज ते परळी या मार्गावर डेमो ट्रेन सुरू आहे. ही गाडी कोल्हापुरातून सुरू करावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापूरहून धावणार असल्याचे आश्वासन जिल्ह्यातील जनतेला दिले होते. लोकसभेला महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान कोल्हापुरात आले होते. तेव्हाच्या प्रचार सभेमध्ये पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या जनतेला याबाबत आश्वस्त केले होते

त्याचबरोबर, कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणाऱ्या कोयना एक्सप्रेसमध्ये चार जनरल डबे वाढवावेत. कोल्हापूर ते सांगलीदरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे आधुनिकीकरण करावे. अमृत भारत योजनेअंतर्गत सध्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि विस्तारीकरण होत आहे. त्या अंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभा करावा.

सध्या कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते धनबाद या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या कोल्हापुरात आल्यावर सुमारे ४८ तास थांबून असतात. अशावेळी या रेल्वे गाड्या, सोलापूर किंवा कलबुर्गी मार्गावर सोडता येतील का, याचाही विचार करावा. या सर्व मुद्द्यांचा व मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यवाही केली जाईल, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी खासदार महाडिक यांना सांगितले आहे.

Back to top button