कोल्हापूर | मुसळधार पावसामुळे केशवराव भोसले आणि खासबाग मैदानाची सामायिक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय, तर एक महिला जखमी असून तिच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज संध्याकाळच्या सुमारास अचानक ही भिंत कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिलांना सव्वा तास रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढण्यात आले. मात्र, यापैकी अश्विनी आनंदा यादव (वय ५९ रा. साईपार्क भोसलेवाडी) या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर संध्या तेली (वय २८) यांना थोडीफार दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
केशवराव भोसले नाट्यगृह येथे काही महिला कार्यक्रमासाठी आल्या होत्या. ही भिंत येथील निर्माणाधीन शौचालयावर पडली. त्यामुळे आतमध्ये असणाऱ्या दोन महिला भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडल्या.
या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु झाले. त्यानंतर काहीवेळातच या महिलांना बाहेर काढण्यात आले.