बदलापूरनंतर कोल्हापूर हादरलं; दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या | Kolhapur Girl Assault And Murder
कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागातून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतेच बदलापूरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्माचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेने राज्यातील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोल्हापुरातील शिये येथील रामनगर परिसरात दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलीय. सबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतााना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलगी मूळची बिहारची असून, ती आपल्या आई-वडील आणि पाच भावंडांबरोबर रामनगर परिसरात राहत होती.
मुलीचे आई-वडील शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात मजूर म्हणून कामाला जातात. काल सकाळपासून मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांत सायंकाळी तक्रार दाखल केली होती. यानंतर शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी व त्यांचे अन्य सहकारी व स्थानिक नागरिकांनी शिये रामनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व परिसरातील विहिरी, ओढे, उसाच्या शेतात तपास केला. पण कोणताच सुगावा हाती लागला नव्हता. त्यानंतर आज पोलिसांच्या डॉग स्कॉडने मुलीला शोधून काढले. शियेपासून काही अंतरावर असलेल्या शेतात या पीडित मुलीचा मृतदेह आढळून आला.
मुलीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा करता येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई येथील घडलेल्या घटनेमुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण असताना शिये येथील ही १० वर्षाची मुलीच्या मृत्युच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.