News

सवलतीच्या दरात कुठेही सहलीला जाण्याआधी ‘ही’ बातमी वाचा; कोल्हापूर पोलिसांनी केली कल्याणमधील एजंटला अटक

कोल्हापूर | शाहूपुरी पोलिसांनी परदेशी सहलीसाठी ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली 4 लाख 85 हजार 557 रुपयांची फसवणूक (Online travel Booking Fraud) केल्याच्या प्रकरणात ठाणे जिल्ह्यातील एजंटला अटक केली आहे. प्रशांत पुरुषोत्तम जावडेकर (38, रा. पुण्योदय पार्क, डॉन बॉस्को स्कूलजवळ, कल्याण) असे आरोपीचे नाव असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जावडेकर 22 महिने फरार होता.

शाल्मली सुनील जोशी (50, रा. निंबाळकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, संशयिताने ‘जिनियस वर्ल्ड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.’ या कंपनीचा एजंट असल्याचे सांगून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीच्या दरात युरोप टूरचे आमिष दाखवले. मार्च 2022 ते जुलै 2022 दरम्यान 2 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 या कालावधीत सहलीचे बुकिंग करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 4 लाख 65 हजार रुपये उकळले. याशिवाय व्हिसा शुल्क म्हणून आणखी 20 हजार 557 रुपये घेतले.

फसवणुकीचा प्रकार
आरोपीने संबंधित रक्कम ऑनलाईन, गुगल पेच्या माध्यमातून स्वीकारली. मात्र, पैसे घेतल्यानंतरही सहलीचे बुकिंग न करता त्याने जोशी कुटुंबाची फसवणूक केली. शाल्मली जोशी यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण जावडेकरने प्रतिसाद दिला नाही. अखेर फेब्रुवारी 2023 मध्ये जोशी यांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयिताला कल्याण पश्चिम येथून अटक केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

Back to top button