News

पंचगंगा महापुराच्या दिशेने, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद; राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू | Kolhapur Flood Update 2024

कोल्हापूर | जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालयं. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्लीजवळ पुराचं (Kolhapur Flood Update 2024) पाणी आल्यानं महामार्ग बंद करण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलीय.

कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. केर्ली-जोतिबा रोड-पन्हाळा रोड-दानेवाडी-वाघबीळ अशा मार्गानं आता वाहतूक सुरू आहे. सध्या पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल सुरू असून राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी 41.2 फूटांवर पोहचलीय. पावसानं जिल्ह्यातील तब्बल 79 बंधारे आणि 38 मार्गांवरील वाहतूक पूराचं पाणी आल्यानं पूर्णतः ठप्प झालीय.

जिल्ह्यातील बहुतांशी धरणं भरली असून राधानगरी धरण 90 टक्के भरले आहे. त्यातून प्रतिसेकंद 1500 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच ‘वारणा’ धरणातील पाणी साठ्यात देखील झपाट्याने वाढ हाेत असून धरण 80 टक्के भरल आहे. पाणी सांडव्यापर्यंत पोहोचल्यानं ‘वारणा’ नदीतील विसर्गही वाढला आहे. त्यामुळं वारणा नदीकाठच्या गावात पावासाचा जोर कमी झाला असला तरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

एस.टी.चे सोळा मार्ग बंद

महापुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं एस.टी.चे सोळा मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागरी या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याखाली असणारे बंधारे

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी, कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, धामणी नदीवरील- सुळे व आंबर्डे, वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे, शाळी नदीवरील- येळाणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, ऐनापूर, निलजी व गिजवणे, घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी असे एकूण 78 बंधारे पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 7.36 टीएमसी, तुळशी 2.62 टीएमसी, वारणा 28.15 टीएमसी, दूधगंगा 16.72 टीएमसी, कासारी 2.04 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 1.89 टीएमसी, पाटगाव 3.26 टीएमसी, चिकोत्रा 0.90 टीएमसी, चित्री 1.82 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 40.8 फूट, सुर्वे 38.4 फूट, रुई 68 फूट, इचलकरंजी 64 फूट, तेरवाड 57.6 फूट, शिरोळ 56.6 फूट, नृसिंहवाडी 53 फूट, राजापूर 41.5 फूट तर नजीकच्या सांगली 27 फूट व अंकली 31.6 फूट अशी आहे.

Back to top button