कोल्हापूर | महापूराचा विळखा सैल, पंचगंगा धोका पातळीच्या खाली, राधानगरी धरणाचे चार दरवाजे देखील बंद | Kolhapur Flood Update
कोल्हापूर | पंचगंगा नदी बुधवारी दुपारी 4 वाजता धोका पातळीच्या खाली आल्याने धास्तावलेल्या पूरग्रस्तांनी (Kolhapur Flood Update) सुटकेचा निःश्वास टाकला. पंचगंगेची पाणी पातळी खाली येऊ लागल्याने महापुराचा विळखा सैल होत आहे. पंचगंगेसह जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणीपातळी देखील कमी होत असून शहरासह जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरत आहे.
दि. 1/08/2024
सकाळी : 9 : 00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
42’5\” (543.11m)
विसर्ग 62143 Cusecs
(नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 73
कोल्हापूर शहरात पुराचे पाणी ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या जामदार क्लबपर्यंत पूराचे पाणी आहे. गेल्या 24 तासांत शहरात 40 मि. मी. पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने गुरुवार (दि. 1), शुक्रवार (दि. 2), शनिवार (दि. 3) हे तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
धरणक्षेत्रात संततधार पडणाऱ्या पावसामुळे बुधवारी पहाटे राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले होते. यापैकी तीन दरवाजे बुधवारी सायंकाळपर्यंत बंद झाले. तर आज दि. 01 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री 01.25 वा. धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 4 बंद झाले आहे. अद्याप धरणाची एकूण 3 ( क्र.5,6,व 7 ) द्वारे उघडलेली आहेत. द्वार क्र. 5,6 व 7 मधून 4284 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 5784 cusec इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे.
जिल्ह्यातील प्रमुख मार्ग वाहतुकीस खुले
पंचगंगा नदी धोका पातळीच्या खाली आल्याने जिल्ह्यातील प्रमुख मार्ग वाहतुकीस खुले होत आहेत. आंबेवाडी – चिखली मार्गावरील पाणी बुधवारी पूर्णपणे ओसरले होते. चिखली-वरणगे पाडळी पुलावरील पाणीदेखील कमी झाले. याशिवाय कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू झाली आहे.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल पाणी ओसरल्याने वाहतूकीसाठी खुला झाला आहे. आंबेवाडीतून वडणगेकडे जाणारा मार्गही खुला झाला आहे. उत्तूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. सध्या जिल्ह्यातील 73 बंधारे पाण्याखाली असून 9 राज्य मार्ग व 44 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 52 मार्ग अद्याप बंद आहेत. तर 24 मार्गावरील एसटी सेवादेखील पूर्णतः बंद आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सात तालुक्यांतील 17 गावांमध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव 66.8, मलकापूर 116.3, आंबा 110.5, राधानगरी तालुक्यातील सरवडे 68.3, राधानगरी 68.3, आवळी 72.3, कसबा वाळवे 72.3. कागल तालुक्यातील बिद्री 71.8, भुदरगड तालुक्यातील गारगोटी 73, कूर 71.8, कडगाव 112, कराडवाडी 73, आजरा तालुक्यातील गवसे 73, आजरा 73, चंदगड तालुक्यातील हेरे 90.5, नारंगवाडी 90.5, चंदगड 90.5 या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सरासरी 44 मि.मी. पाऊस झाला.