कोल्हापूर | पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे विजेच्या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने आईसह मुलाचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे. शेतात मुलगा नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेल्यानंतर परत न आल्याने त्याला पाहण्यासाठी आई गेली होती. नंदा गुंगा मगदूम आणि आणि त्यांचा मुलगा अजिंक्य गुंगा मगदूम अशी जागीच मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकरांची नावे आहेत.
शेतात गेला अन् परतलाच नाही
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अजय नेहमी सकाळच्या सुमारास शेतात जातो. नेहमीच्या सवयीने तो आजही शेतात कामासाठी सकाळी सातच्या सुमारास गेला होता. तासभर काम करून घरी परतणारा मुलगा अजय अजून कसा घरी परतला नाही? या चिंतेत असलेल्या आईने मुलगा फोन केला. मात्र, फोन न उचलल्याने त्या पाहण्यासाठी शेतात गेल्या. शेतात अजय पडल्याचे दिसून आल्यानंतर आई नंदा यांनी अजयला उचलण्याच्या नादात स्पर्श केला असावा आणि त्यांनाही वीजेचा धक्का बसला. मंगळवार पेठ, पन्हाळामध्ये जामदडकी शेतात हा प्रसंग घडला.
आजूबाजूच्या लोकांनी प्रसंग पाहून आरडाओरडा केल्यानंतर माय लेकरांच्या दुर्दैवी मृत्यूची घटना कळाली. एमएसईबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पन्हाळा पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला.
अजय हा विवाहित असून घरातील कर्ता पुरुष होता. आई, पत्नी व 2 लहान मुलांसह तो पन्हाळा येथील मंगळवार पेठ भागात रहात होता. मोलमजुरी व शेती करून मगदूम आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.