Kolhapur Crime News | लग्नाच्या आमिषाने घटस्फोटित महिलेवर अत्याचार; 11 लाख रुपयेही उकळले

कोल्हापूर | घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत तब्बल १०.९४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील फिरोज निजाम शेख या व्यक्तीविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुनर्विवाहासाठी संबंधित महिलेने एका ऑनलाईन वेबसाईटवर प्रोफाईल तयार केले होते. या वेबसाईटवरील माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात फिरोज शेख याने तिच्याशी संपर्क साधला आणि लग्नासाठी इच्छा प्रकट केली. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करण्यासाठी शेख कोल्हापूरला आला आणि महिलेच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली.

महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्याने तिला शहरातील एका लॉजवर बोलावले व तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तिची बदनामी केली जाईल, अशी धमकीही त्याने दिली.

पैसे आणि दागिने घेऊन संपर्क तोडला

व्यवसायाच्या निमित्ताने संशयिताने महिलेकडून २५ हजार रुपये घेतले. डिसेंबर महिन्यात आयकर खात्याचा छापा पडल्याचे सांगून त्याने स्वतःला वाचविण्यासाठी ११ तोळे सोन्याचे दागिने व १.६९ लाख रुपये उकळले. पैसे आणि दागिने घेतल्यावर मात्र शेखने तिच्याशी संपर्क टाळण्यास सुरुवात केली.

फसवणुकीची जाणीव होताच पोलिसांत धाव

वारंवार संपर्क साधूनही शेखकडून टाळाटाळ झाल्याने महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.