कोल्हापूर: अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार करून गर्भवती केल्या प्रकरणी आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरी | Kolhapur Crime News
कोल्हापूर: नवीन वाशी नाका परिसरातील एका कोल्ड्रिंक दुकानात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी आशिष अशोक जाधव याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती पी.एफ. सय्यद यांनी 20 वर्षांच्या सक्तमजुरीची आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Kolhapur Crime News: फेब्रुवारी 2019 मध्ये, मंगळवार पेठेतील वारे वसाहत परिसरात राहणाऱ्या जाधव याने एका अल्पवयीन मुलीला नवीन वाशी नाका परिसरातील एका कोल्ड्रिंक दुकानात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेमुळे मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली. यानंतर पीडितेच्या आईने करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके आणि पैरवी अधिकारी सागर पोवार यांच्या टीमने तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी वकील एस.एस. रोटे यांनी या खटल्यात सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. पीडितेची आणि फिर्यादीची साक्ष, तसेच वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे, शारीरिक संबंध ठेवून तिला चार महिन्याची गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी आशिष अशोक जाधव याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सय्यद यांनी 20 वर्षांच्या सक्तमजुरीची आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीला न्यायालयातून कारागृहात नेताना त्याच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित केली.