खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं; इचलकरंजीत डोक्यात दगड घालून अल्पवयीन तरूणाचा खून | Kolhapur Crime News
कोल्हापूर | जिल्ह्यात दिवसेंदिवस खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. इचलकरंजी – शहापूर येथील शाळेच्या पाठीमागे अल्पवयीन युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय. सुशांत कांबळे (रा. आसरानगर, इचलकरंजी) असं या तरूणाचं नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आज (गुरुवारी) सकाळी उघडकीस आलीय.
Kolhapur Crime News: सुशांत कांबळेचा खून तीन ते चार जणांच्या टोळक्याने केल्याची असल्याची शक्यता आहे. यातील काही संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने ताब्यात देखील घेतल्याचे समजते. शर्यतीच्या कारणावरून पूर्वी झालेला वाद नशा केल्यानंतर उफाळून आला आणि त्यातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
शहापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवला आहे. मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. सुशांत हा एका मित्राच्या वाढदिवसासाठी जातो असे सांगून काल सायंकाळीच घरातून बाहेर पडला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच
कोल्हापुर शहरात दोन दिवासांपुर्वीच राजारामपुरीत पूर्ववैमनस्यातून पंकज निवास भोसले याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला होता. दिवसाढवळ्या लोकांच्या समोर हा खून झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी गणेश विक्रम काटे, नीलेश विक्रम काटे, उमेश विक्रम काटे या भावंडांसह अमित उल्हास गायकवाड याला अटक केली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस गुंडगिरी फोफावत असून पूर्ववैमनस्यातून खुनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचा कोणताही वचक गुंडगिरी करणाऱ्यावर राहिला नसल्याचे सर्वत्र चर्चिले जात आहे.