कोल्हापूर | उपचारासाठी आलेल्या रूग्णांकडून दोन हजाराची नोट न स्विकारल्याबद्दल दसरा चौक परिसरातील डॉक्टर प्रद्युम्न वैराट यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वैराट यांच्या विरोधात मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आल्याचे तक्रारदार रणजीत माजगावकर यांनी सांगितले आहे.
रणजीत माजगावकर त्यांच्या पत्नी शिल्पा माजगावकर यांना डॉ. वैराट यांच्याकडे उपचारासाठी घेऊन गेले होते. यावेळी वैराट यांनी माजगावकर यांना काही औषधे लिहून दिली. डॉक्टरानी दिलेली औषधे घेण्यासाठी माजगावकर यांनी परिसरातील अनेक मेडिकल पालथी घातली मात्र वैराट यानी दिलेली औषधे केवळ डॉक्टरांच्या हॉस्पिटलला लागून असणाऱ्या केबिन वजा मेडिकल मध्येच मिळतात असे आजूबाजूच्या सर्व मेडिकल चालकानी सांगितले.
त्यानंतर माजगावर यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधांची चिठ्ठी वैराट यांच्या मेडिकलमध्ये दाखवली असता मेडिकल चालकाने त्यांना 881 रुपयांची औषधे दिली. औषधाच्या बिलापोटी माजगावकर यांनी 2 हजार रुपयांची नोट दिली असता दोन हजार रुपयांची नोट आम्ही स्वीकारत नाही असे सांगून दिलेली औषधे परत घेतली.
यावर माजगावकर यांनी मेडिकल चालकास समजावण्याचा प्रयत्न केला, की अद्यापही ही नोट बंद झालेली नाही. चलनात आहे, असा कुठलाही आदेश आलेला नाही. मात्र या मेडिकल चालकांनी डॉक्टरांकडे बोट दाखवत तुम्ही डॉक्टरांसोबत बोला आणि त्यांनाच ही नोट द्या असे सांगितले.
शेवटी माजगावकर यांनी डॉ. वैराट यांच्याकडे जाऊन याबद्दल सांगितले असता आम्ही 2 हजार रुपयाची नोट स्वीकारत नसल्याचे डॅाक्टरांनीही सांगितले. यावेळी माजगावकर यांनी, असा कुठलाही GR अद्याप आलेला नाही, अजून नोट बंद व्हायला चार महिन्यांचा अवधी आहे. तुम्ही ती नोट स्वीकारा आणि औषध द्या असे शांतपणे सांगितले. यावर डॉक्टरांनी, ‘तुमच्या नोटा खपवायला आम्ही बसलेलो नाही, तुम्हाला औषध घ्यायचे असेल तर घ्या, अन्यथा निघा असे सांगितले.
या प्रकारामुळे माजगावकर यांनी मी माध्यम प्रतिनिधी असल्याचे सांगत, तुम्ही जर अशी उत्तर देत असाल तर ही बातमी होईल. तसेच जर तुमच्याकडे एखादा पेशंट चंदगड किंवा शाहूवाडी वरून आला आणि त्यांच्याकडे अशा पद्धतीची नोट असती तर तुम्ही असेच वागला असता का? असा डॅाक्टराना प्रश्न केला. माजगावकरांच्या या प्रश्नावर डॉक्टर वैराट यांनी अतिशय संतापजनक उत्तर देत मी त्यांच्याकडूनही नोट स्वीकारली नसती असे सांगितले. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत माजगावकर यांनाच अरेरावी केली.
वैराट डॉक्टरांनी ही नोट न स्वीकारल्यामुळे माजगावकर यांना त्यांनीच लिहून दिलेली औषधे अजूनही मिळालेली नाहीत. कारण ही औषधे केवळ त्यांच्याच मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे डॅा. वैराट यांच्या या वागण्यामुळे माजगावकर कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
वैराट डॉक्टरांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये तसेच केबिन वजा मेडिकलमध्ये 2 हजार रुपयांची नोट स्वीकारणार नाही असा बोर्ड लावलेला नाही. मात्र गोळ्या औषधांवर कुठलाही डिस्काउंट मिळणार नाही हा बोर्ड मात्र आवर्जून लावला आहे.
डॅा. वैराट यांच्या अशा उध्दट आणि मनमानी वर्तणुकीमुळे त्यांच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची कशा पद्धतीने आर्थिक पिळवणूक होत असेल याचा अंदाज येत आहे.