यू-ट्यूब मधून पैसे मिळवण्याची संधी! लवकरच लाँच होणार नवीन फिचर | You Tube New Feature

मुंबई | यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. (You Tube New Feature) काही व्हिडीओ बनवून चॅनेलवर अपलोड करून पैसे कमवतात. असे अनेक यूट्यूब चॅनेल उपलब्ध आहेत. आता यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याची आणखी संधी मिळणार आहे. नव्या पर्यायाद्वारे कंटेंट क्रिएटर्सला फायदा होणार आहे. 

सध्या यू-ट्यूबवर कमाईसाठी आठ प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. पण, आता गुगल ही कंपनी यू-ट्यूब युजर्सना पैसे कमवण्यासाठी आणखी एक पर्याय देत आहे. अनेक कंटेंट क्रिएटर्सना याचा फायदा होईल. गुगल आणि यू-ट्यूबनं नुकतीच ‘कोर्सेस’ या फीचरची घोषणा केली आहे. येत्या काळात ते रिलीज केलं जाईल.

यूट्यूब इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक इशान जॉन चॅटर्जी यांनी सांगितले की, YouTube Courses फक्त भारत, दक्षिण कोरिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये सुरू केले जातील. या कोर्सेसद्वारे, युजर्स सोप्या पद्धतीने स्वत:चे कौशल्य वाढवू शकतील. आता हे कंटेंट प्रोड्युसरवर अवलंबून आहे की, या माध्यातून मॉनेटाइज करायचं आहे की नाही. त्यांना यातून फायनान्शियल रिवार्ड मिळवायचे असतील, त्यांनाही लवकरच पर्याय मिळेल.

यू-ट्यूब आपलं नवीन कोर्सेस हे फीचर चार प्रकारांमध्ये लाँच करणार आहे. डिजिटल स्कील्स, आंत्र्यप्रेन्युअरशीप, प्रोफेशन आणि पर्सनल पॅशन या चार प्रकारांचा त्यामध्ये समावेश आहे. यू-ट्यूब प्रोड्युसर्स पीएनजी आणि पीडीएफ फॉरमॅटमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात. यामुळे ते शिकवत असलेल्या अभ्यासक्रमाचं स्पष्टीकरणदेखील युजर्सना उपलब्ध होईल.

गुगल त्याच्या निवडक पार्टनर आणि लेखकांसह या फीचरची चाचणी घेत आहे. हे फीचर सबस्क्रिप्शन आधारित मॉडेल असेल. भारतात 6 कोटी व्हिडीओ असे आहेत जे शिक्षण आणि कौशल्य कंटेंटवरर लक्ष केंद्रित करतात. यूट्यूबच्या या पावलामुळे देशातील आघाडीच्या एडटेक कंपन्यांसमोर आव्हान निर्माण होणार आहे.