Saturday, September 23, 2023
HomeNewsकिरीट सोमय्या कागलच्या ऊरूसात जेवायला येणार? काय आहे नेमकं प्रकरण? Kirit Somaiya

किरीट सोमय्या कागलच्या ऊरूसात जेवायला येणार? काय आहे नेमकं प्रकरण? Kirit Somaiya

मुंबई | अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी पक्षात बंड करून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनीही शपथ घेतली. यामध्ये ईडीच्या (ED) रडारवर असलेल्या हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचाही समावेश आहे. इकडे अजित पवार यांच्या सोबत हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतली आणि लोकांमध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याबद्दल एकच चर्चा रंगली, ती म्हणजे किरीट सोमय्या कागलच्या ऊरूसात जेवायला येणार असल्याची… लोकांच्यात ही चर्चा रंगण्याचं नेमकं कारण काय.. चला जाणून घेऊया..

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांविरोधात गैरव्यवहार प्रकरणांवरून जोरदार मोहिम उघडली होती. यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आधी नेत्यांविरोधात सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळा, साखर कारखान्यातील गैरव्यवहार अशा अनेक प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तीकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.

राष्ट्रवादीचे कागलमधील आमदार मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या तक्रारींमुळे चौकशी सुरु आहे. ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ईडीने अनेकदा मुश्रीफांच्या घरी तसेच कार्यालयांवर छापेमारी केली आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये मुश्रीफ यांच्यावर अटकेची सतत टांगती तलवार आहे. त्याशिवाय, कोल्हापूर आणि मुंबईतही मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सध्या कोल्हापूरमध्येच मुश्रीफ यांच्याविरोधात 108 तक्रारी दाखल असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणात मुश्रीफ यांच्याबरोबर सोमय्यांची चांगलीच जुंपली होती आणि सोमय्या यांना पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यास अटकाव केला होता.

किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले बहुतांशी नेते हे भाजपात सामिल झाल्याचा इतिहास आहे. यामध्ये नारायण राणे, कृपाशंकर सिंह, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते आदी नेत्यांवर त्यांनी आरोप केले होते, तसेच हे सर्व नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावाही सोमय्यांनी केला होता. मात्र, या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांच्यावरील कारवाईच बंद झाली.

शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक, यामिनी जाधव व यशवंत जाधव आदींविरोधातही सोमय्या यांनी आघाडी उघडली होती. शिंदे गटातील हे नेते भाजप बरोबर आल्यावर सोमय्यांची तोफ थंडावल्याचे पहायला मिळले होते. हेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबतही होणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

त्यामुळेच मुश्रीफांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेताच राज्यभर सोमय्यांची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. किरीट सोमय्या कागलच्या ऊरूसात जेवायला येणार ही व्हायरल होणारी पोस्ट त्याचाच भाग असून किरीट सोमय्या आणि ईडीची कारवाई टाळण्यासाठी सत्तेत सहभागी झालेल्या मुश्रीफांच्या वर्मावर बोट ठेवणारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular