News

धक्कादायक! कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भीषण आगीत जळून खाक

कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत नाट्यगृह पूर्णतः जळून खाक झाले आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या खासबाग मैदानाच्या बाजूने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

उद्या संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी आवरून कर्मचारी घरी गेले होते. त्यावेळी आग लागल्याची घटना घडली. संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. या भीषण आगीत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाले आहे.

दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये. या आगीत कुस्ती मैदानाची व्यासपीठ जळून खाक झाले आहे. संपूर्णपणे लाकडाचे असल्याने ही आगीने भडका पकडला होता. या कुस्ती मैदानाला लागूनच केशव भोसले नाट्यगृह असल्याने त्यालाही आग लागली. रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोमच्या धर्तीवर साकारलेले ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान आणि शाहूकालीन पॅलेस थेटर म्हणून ओळखलं जाते.

नाट्यगृहाचा स्टेज जळून खाक

नाट्यगृहात कोणीही नसल्याने कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचा संपूर्ण स्टेज जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा इतिहास आहे. नाटकाचे अनेक प्रयोग इथे होत असतात. अनेक कलाकार इथे, या नाट्यगृहात घडले आहेत. मात्र या नाट्यगृहाला आग लागल्याने अनेकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. अनेक कलाकार, आमदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह जळताना बघवत नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Back to top button