News

काळम्मावाडी येथे दोन तरूण बुडाले, वर्षा पर्यटन बेतले जिवावर | Kolhapur Kalammawadi

कोल्हापूर | पुणे जिल्ह्यातील लोणावळा तेथील भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरातील काळम्मावाडी (Kolhapur Kalammawadi) येथेही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळम्मावाडी येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झालाय.

निपाणी येथील १३ युवक काळम्मावाडी, राधानगरी येथे वर्षाविहारासाठी आले होते. त्यातील दोन युवक पाण्याच्या डोहात बुडाले. गणेश चंद्रकांत कदम (वय १८), प्रतीक पाटील (२२, दोघेही रा. आंदोलननगर निपाणी ) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना सोमवार सकाळच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गणेश कदम हा युवक पोहता येत नसताना काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेल्या गाडी चालकाने डोहात उडी घेतली. बुडणाऱ्या गणेश पर्यंत तो पोहचला पण गणेशने प्रतीकला मिठ्ठी मारल्याने दोघेही बुडाले.

पोलीस ठाणे बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू

घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाणे बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे. पाऊस जास्त असल्याने पाण्याचा प्रवाह वाढत आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. अद्याप दोघांचेही मृतदेह हाती लागलेले नाहीत.

या घटनेतील मृत प्रतीक पाटील याचा टेम्पो व्यवसाय आहे. त्‍याच्या पश्चात आई, बहिण, भाऊ असा परिवार आहे तर मृत गणेश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांने नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

दरम्यान एकाच भागात राहणाऱ्या गणेश व प्रतीक यांचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Back to top button