कागल हसन मुश्रीफांचाच! समजरजित राजेंची तुतारी मुश्रीफांनी वाजूच दिली नाही | Kagal Vidhan sabha Election Result 2024

कोल्हापूर | राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभा मतदार संघात (Kagal Vidhan sabha Election Result 2024) हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समरजीत घाटगे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. शरद पवार गटाकडून तगडा विरोध होऊन सुद्धा मुश्रीफांनी विजय खेचून आणला आहे.

हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचा 11 हजार 609 मतांनी पराभव करत पुन्हा एकदा आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेतली आहे. हसन मुश्रीफ अजित पवार गटांमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच समरजितसिंह घाटगे यांना बळ दिलं होतं. त्यामुळे कागलची लढाई राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात चर्चेचा विषय झाली होती.

शरद पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार करत या गद्दारांना पाडा असं आवाहन केलं होतं. शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी देखील मुश्रीफांविरोधात प्रचार केला होता. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 28 हजार मतांनी मुश्रीफांनी विजय मिळवला होता. मात्र, यावेळी मताधिक्य कमी झालं असलं तरी त्यांनी विजयाची परंपरा कायम राखली आहे.

समरजित घाटगे यांना मात्र कागलच्या जनतेने आमदारकी पासून रोखलं असून घाटगेंच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. पोस्टल मतदानात समरजित घाटगे यांनी आघाडी घेतली होती. सुरुवातीच्या कलांमध्ये घाटगे आणि मुश्रीफांमध्ये चांगलीच चुरस होती. मात्र, अखेरच्या फेऱ्यांमध्ये आघाडी वाढत गेल्याने मुश्रीफ यांचा विजय निश्चित झाला.