राज्यातले कोणतेही वर्तमानपत्र, कोणतीही वृत्त वाहिनी आणि कोणत्याही मोठ्या समूहाचे न्यूज पोर्टल पाहावे. पत्रकारितेची लाज वाटावी अन् आपल्या हतबलतेची खंत वाटावी असे चित्र दिसते. सातत्याने सर्वच राजकीय पक्षातले किमान डझनभर नेते रोज उठून कुणावर तरी तोंडसुख घेत असतात. वाट्टेल त्या शब्दांत गरळ ओकत असतात. कुणीही कुणावरही अक्षरशः भुंकतं! एकमेकांची उणीदुणी काढायची, शिव्यांची लाखोली वाहायची, मल्लिनाथी करायची!
याच्या बातम्या तरी कशा असतात – अमक्याने केला घणाघात, तमक्याने केला प्रहार, फलाण्याने आसूड ओढला, बिस्ताण्याने धुलाई केली!
अरे चालवलेय तरी काय तुम्ही?
यांची तोंडे कोण आवरणार?
आज २१ जून उजाडलाय. राज्यात पाऊस नाहीये. धरणे कोरडी पडताहेत. खरीप वाया जाण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. गावोगावी काही पथके फिरून पाणी जपून वापरा म्हणून सांगत आहेत ते कशासाठी? पर्जन्यमान घटणार हे स्पष्ट दिसतेय, जून संपत आला तरीही तापमान अजूनही कमी होताना दिसत नाहीये. सामान्य जनता अक्षरशः होरपळून निघतेय आणि हे बोलभांड मुखंड रोज उठून ओकाऱ्या करताहेत!
किमान लाजा बाळगाव्यात यांनी!
वृत्त वाहिन्यांनी स्टिंग करणं बंद केलंय, दैनिकांनी / वाहिन्यांनी आपला कर्मचारी वर्ग कमी केला आहे. याची तपशीलवार माहिती बाहेर आली की यांच्या बातम्या अशा स्वरूपाच्या का आहेत हे स्पष्ट होईल. स्टुडिओत बसून खुर्च्या उबवून बाष्कळ चर्चेचे गाळप करणे हीच पत्रकारिता झालीय का? हरेक जिल्ह्यात, हरेक तालुक्यात कोणते ना कोणते जीवघेणे यक्षप्रश्न आहेत त्यावर अपवाद वगळता कुणीही चकार शब्द बोलताना दिसत नाही. सर्वच क्षेत्रात महागाईने कहर केलाय. विविध नागरी प्रश्न जैसे थे आहेत, सर्वच राजकीय पक्ष या सुंदोपसुंदीत सामील आहेत.
पत्रकारिता इतकी बधिर, कलंकित नि लाचार कधीच नव्हती! सद्यकाळचे चित्र अत्यंत क्लेशदायक नि संतापजनक आहे.
या माध्यमांना, पत्रकारितेला जाब विचारण्याची ताकद सामान्यजणांनी का नि कशी गमावलीय हा प्रश्नही ज्याने त्याने स्वतःला विचारला पाहिजे!
मग सारेच गुंते आपसूक सुटतील!
– Sameer Gaikwad (यांच्या फेसबुक वॉलवरून – लेखक, ब्लॉगर, स्तंभलेखक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत)