खुशखबर : ‘ही’ एरोस्पेस कंपनी भारतात 2000 जागांसाठी भरती करणार; संधी चुकवू नका | Job

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. यात नोकरी (Job) गमावणाऱ्यांमध्ये इंजिनीअर्सची संख्या लक्षणीय आहे. या दरम्यान, भारतात मात्र नोकरीच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. महागाई आणि अमेरिकेतली मंदी यांसारख्या समस्यांमध्ये भारतीय आयटी क्षेत्रात दोन लाख नवीन कर्मचाऱ्यांना नोकरी मिळेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार अशा संधी निर्माण होताना दिसून लागल्या आहेत. नुकतीच ‘कॉलिन्स एरोस्पेस’ या मोठ्या बहुराष्ट्रीय संरक्षण कंपनीने भारतात नवीन दोन हजार नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केली आहे. ‘टेक गिग’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कॉलिन्स एरोस्पेसचे अध्यक्ष स्टीव्ह टीम म्हणाले, की ‘गेल्या 25 वर्षांपासून कंपनी भारतातल्या एरोस्पेस उद्योगासाठी वचनबद्ध आहे. स्थानिक बाजारपेठेत कंपनी दीर्घकालापासून इनोव्हेशन्स, आर अँड डी आणि एसटीईएम क्षेत्रातल्या संधींना थेट पुढे नेत आहे. कंपनीने अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतांमध्ये 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीचं नियोजन केलं आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात अतिरिक्त दोन हजार अति कुशल कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार कंपनी करत आहे.’

नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी ‘ही’ लिंक वापरा

साइट्स रेथिऑन टेक्नॉलॉजीज या कंपनीची उपकंपनी असलेल्या कॉलिन्स एरोस्पेसने नुकतंच बेंगळुरू येथे आपल्या नवीन ग्लोबल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटर (जीईटीसी) आणि कॉलिन्स इंडिया ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन केलं आहे. या प्रसंगी अध्यक्ष स्टीव्ह टीम बोलत होते. भारतातल्या नवीन साइट्स रेथिऑन टेक्नॉलॉजिजसाठी दीर्घकालीन वाढीच्या धोरणाचा एक भाग आहेत. कंपनी ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करून जागतिक स्तरावर सहकार्य आणि नावीन्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी देशात अतिरिक्त एसटीईएम-आधारित संधी प्रदान केल्या जाणार आहेत.

रेथिऑन टेक्नॉलॉजिजच्या सर्व व्यवसायांची जागतिक वाढ आणि गुंतवणूक धोरणासाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. इथल्या प्रगत पायाभूत सुविधा आणि टॅलेंट पूल हे घटक एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर देशाच्या योगदानाला चालना देण्यासाठी मदत करतील.

कॉलिन्स एरोस्पेसच्या बेंगळुरूमधल्या इतर तीन ठिकाणी अंदाजे तीन हजार इंजिनीअर्स अभियंते, इतर रेथिऑन टेक्नॉलॉजिज ग्रुप ऑफ कंपन्यांमधले सुमारे 600 कर्मचारी, नॉर्थगेट टेक पार्कमधल्या चार लाख 13 हजार स्क्वेअर फूट जीईटीसीमध्ये स्थलांतरित होतील. हे सर्व जण पुढच्या वर्षी नवीन क्षमतांसह तीन एकर जमिनीवर कंपनीला आपल्या पाऊलखुणा विस्तारण्यासाठी मदत करतील.