नवी दिल्ली | आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या क्षेत्रात येत्या काळात प्रत्यक्षरित्या 50 हजार तर अप्रत्यक्षरित्या 1.50 लाख रोजगाराच्या संधी (IT Recruitment 2023) निर्माण होणार आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या डेल, एचपी, लिनोवो, फॉक्सकॉन अशा 27 कंपन्यांना भारत सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेंतर्गत मंजुरी मिळाली मिळाली आहे, याबाबतची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळालेल्या 95 टक्के कंपन्या पहिल्या दिवसांपासून उत्पादन सुरू करणार आहेत. जवळपास 23 कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. तर उर्वरित चार कंपन्या येत्या तीन महिन्यांमध्ये या योजनेंतर्गत उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 27 कंपन्या आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यातून 50 हजार रोजगार निर्माण होतील. तर अप्रत्यक्षपणे 1.5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहेत. आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ज्या कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यात डेल, फॉक्सकॉन, लिनोवो, फ्लेक्सट्रॉनिक्स, पेजेट, सोजो, व्हीव्हीडीएन, सिरमा, भगवती, निओलिंक या कंपन्यांचा समावेश आहे.
देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 2.0 प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना सुरू केली आहे. आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या नवीन क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यासाठी करकार 17 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.