News

महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडून 33/11 केव्ही उपकेंद्राची पाहणी, वीज पुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेसाठी सज्ज राहण्याचे आदेश | Mahavitran Kolhapur

कोल्हापूर | कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला दुधाळी येथील 33/11 केव्ही उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येतो. पूर स्थिती निर्माण झाल्यास महावितरणच्या (Mahavitran Kolhapur) या उपकेंद्राला सर्वप्रथम फटका बसतो. पंचगंगेची वाढती पातळी लक्षात घेत कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वनिल काटकर यांनी या उपकेंद्राची पाहणी केली. यावेळी काटकर यांनी पूर स्थिती निर्माण झाल्यास शहरातील बहुतांश भागाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याची पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यास सबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

३३/११ केव्ही दुधाळी उपकेंद्रामधून शहराच्या विविध भागांत वीज पुरवठा करणारे गंगावेश फिडर, शुक्रवार गेट फिडर, मिराबाग फिडर, मस्कुती फिडर, साकोली फिडर, महाद्वार फिडर, लक्षतीर्थ फिडर व स्टेशन ट्रान्सफॉर्मर फिडर हे ११ केव्हीचे आठ फिडर निघतात. सन 2019 व 2021 मध्ये पूराचे पाणी 33/11 केव्ही दुधाळी उपकेंद्रामध्ये आल्याने या आठही फिडरवरील वीज ग्राहकांचा पुरवठा बाधित झाला होता. 33/11 केव्ही दुधाळी या उपकेंद्रावर सुमारे 23 हजार घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहक आहेत. पूर परिस्थितीत यातील सुमारे 20 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पर्यायी यंत्रणेद्वारे (बॅक फीडिंग) सुरु करण्यात येतो तर सुमारे तीन हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येतो. 

सध्या पडणारा पाऊस व पंचगंगेची वाढती पातळी लक्षात घेत मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी शहरास पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरु करण्याच्या यंत्रणेची माहिती घेऊन ही यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कोल्हापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने, चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता देवदास कोरडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, सहाय्यक अभियंता संजय सानप व इंद्रजित कांबळे तसेच दुधाळी उपकेंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

पावसात वीज यंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन – Mahavitran Kolhapur

कोल्हापूर परिमंडल अंतर्गत असलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पावसात जोराचा वाहणारा वारा, पाऊस तसेच झाडांच्या फांद्या व झाडे वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज वाहिन्या तुटतात. यामुळे जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी वीज यंत्रणेपासून सावध राहावे. वीज यंत्रणेत कोणताही बिघाड झाल्याचे लक्षात आल्यास तात्काळ महावितरण कार्यालय वा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच सतत पडणारा पाऊस व चिखल यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करताना कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. यामुळे वीज पुरवठा बाधित ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण करत आहे.

Back to top button