Infosys Recruitment 2025: भारतातील अग्रगण्य आयटी कंपनी इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 11% नफा वाढ नोंदवित ₹6,806 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीचा नफा ₹6,106 कोटी होता. महसूल देखील 7.6% वाढून ₹41,764 कोटींवर पोहोचला आहे. उत्तर अमेरिकेत कंपनीला सुमारे 5% वाढ झाली असून, आर्थिक वर्षाच्या अखेरीस महसूल वाढ 4.5% ते 5% दरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 5,591 कर्मचाऱ्यांची भरती केली असून एकूण कामगार संख्या 3,23,379 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षात 20,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे, ज्यात फ्रेशर्सचा मोठा समावेश असणार आहे.
फ्रेशर्ससाठी संधी
2022 मध्ये इन्फोसिसने सुमारे 2,000 फ्रेशर्सना नियुक्तीचे प्रस्ताव दिले होते, मात्र त्यांची जॉइनिंग विलंबित झाल्याने कंपनीवर टीका झाली. कामगार संघटनांनी यावरून विरोध दर्शवत कंपनीविरोधात आंदोलनाची तयारी दाखवली होती. हे फ्रेशर्स जवळपास दोन वर्षांपासून रुजू होण्याच्या प्रतीक्षेत होते.
कंपनीने स्पष्ट केले आहे की सर्व उमेदवारांना सामावून घेतले जाईल, तसेच व्यवसायाच्या गरजेनुसार जॉइनिंगच्या तारखा ठरवण्यात येतील. आयटी क्षेत्रात फ्रेशर्सच्या जॉइनिंगला उशीर होण्याच्या समस्या वाढल्या असून याबाबत कंपन्यांना अधिक सजग राहावे लागणार आहे.
लाभांश आणि इतर आर्थिक निर्णय
कंपनीने प्रति शेअर ₹21 अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख 29 ऑक्टोबर आणि पेआउट तारीख 8 नोव्हेंबर निश्चित केली आहे.