News

कोल्हापूरातील प्रसिद्ध उद्योगपती आर. एम. मोहिते यांचे निधन

कोल्हापूर | मोहिते टेक्स्टाइल्सचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती रामचंद्र मारुती ऊर्फ आर. एम. मोहिते यांचे गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. काही दिवसांपासून आजारी असलेल्या मोहिते यांनी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे दिलीप आणि शिवाजी मोहिते, चार मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

आर. एम. मोहिते यांचा जन्म 16 मार्च 1934 रोजी करवीर तालुक्यातील केर्ले गावात झाला. वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेने त्यांनी कंत्राटी कामांच्या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू केला. त्यांनी निनाईपरळ ते उदगिरी घाट रस्त्याचे दुर्गम काम पूर्ण करून 1962 ते 1976 या कालावधीत आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली. राजापूरजवळील पाचल ते जवळे हा 17 कि.मी.चा रस्ता तयार करण्याचे कामही त्यांना मिळाले. ट्रॅक्टर-ट्रॉली, रोलर, बुलडोझर इत्यादी साधनसामग्रीसह घेतलेले काम वेळेत पूर्ण करणारा कंत्राटदार म्हणून मोहिते यांनी नावलौकिक मिळवला.

1980 च्या दशकात त्यांनी रायगड जिल्ह्यातील भिरा येथील धरणाचे महत्त्वाचे कंत्राट सात वर्षांत पूर्ण केले. त्यानंतर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि चंदगड येथे विविध पाणीप्रकल्पांच्या कामांमध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी केली. 1995 साली मंगरायाचीवाडी येथे त्यांनी आर. एम. मोहिते टेक्सटाइल्स लि. ही कंपनी सुरू केली. गरजूंसाठी 1996 मध्ये शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली, तसेच फोर्ट इंटरनॅशनल स्कूलचीही स्थापना केली.

त्यांच्या बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोल्हापूर महापालिकेने मानपत्र देऊन गौरव केला होता. 2022 साली डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता. शुक्रवारी सकाळी 9 वाजता नागाळा पार्क येथील निवासस्थानातून अंत्ययात्रा काढून पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Back to top button