मनोज जरांगे यांच्याबाबत राज्यसरकारचा मोठा निर्णय; सुरक्षा वाढवली | Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्री शंभुराज देसाई (Shamburaj Desai) यांनी याबाबत माहिती दिली. मागील काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांचं घर आणि उपोषणस्थळाच्या भोवती ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवल्याचा संशय होता. त्यानंतर मराठा समाजाने आक्रमक होत मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली होती.
बुधवार (ता.३) जुलै रोजी जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आदोलन करण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे राहतात. त्या निवासस्थानी आणि आंदोलनाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अज्ञात ड्रोनद्वारे टेहळणी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून त्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी होत होती.
मनोज जरांगे पाटलांना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून जरांगे पाटील यांच्यासोबत आता चार शस्त्रधारी पोलिस आणि एक पोलिस व्हॅन तैनात केली जाणार आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी ही माहिती दिली. शंभूराज देसाई म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी अंतरवाली सराटी इथला मुद्दा मांडला होता. याबाबत पोलिस अधीक्षकांनी अहवाल दिला आहे. त्यानुसार,रात्रीचं ड्रोन सर्वेक्षण झालं होतं, त्याची तीन पथकांमार्फत चौकशी करण्यात आलीय. त्यामुळेच जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवली आहे.