कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करा: आ. जयश्री जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Kolhapur Municipal Corporation
कोल्हापूर | शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करावी, अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अधिवेशन काळात आमदार जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
गेल्या पन्नास वर्षापासून कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महापालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला. परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. सद्य:स्थितीत कोल्हापूर महापालिकेची हद्द ६६.८२ चौरस किलोमीटर आहे. एवढ्या कमी जागेत तब्बल सात लाख लोक राहतात. शहराची उभी वाढ होत असताना शहर आडवे वाढण्याची गरज आहे. मात्र शासनाच्या चुकीच्या उदासीन धोरणामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी जनभावना आहे आणि त्यासाठी नागरिकांनी वारंवार आंदोलने केले आहे. परंतु शासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही.
कोल्हापूर महापालिका प्रशासनाने 2013 पासून 2021 पर्यंत 4 वेळा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले आहेत. 2014 मध्ये 17 गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर राज्य शासनाकडून कोणतीही कार्यवाही केलेली नाही किंवा कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने शासनाने हद्दवाढीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2021 मध्ये आपल्या सूचनेनुसार 18 गावे व दोन एमआयडीसींसह नवीन प्रस्ताव कोल्हापूर महापालिका प्रशासनाने आपल्याकडे सादर केला आहे. मात्र या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
हद्दवाढ झाली नसल्याने कोल्हापूर शहराचा विकास खुंटला आहे. शहराची वाढ झाली नसल्याने नवे उद्योग येत नाहीत. हद्दवाढीचा परिणाम उद्योगांवरही झालाय. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन शहराची हद्दवाढ करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.