Sunday, September 24, 2023
HomeCareerजुलै महिन्यात 100 ते 106 टक्के पाऊस; सविस्तर जाणून घ्या हवामान विभागाचा...

जुलै महिन्यात 100 ते 106 टक्के पाऊस; सविस्तर जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज | IMD Weather Forecast

पुणे | जुलै महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र 100 ते 106 टक्के म्हणजे सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे. देशात सरासरी 280.4 मि.मी. इतका (94 ते 106 टक्के) पाऊस राहील. ‘ला निना’ सक्रिय असले तरी भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने पाऊस चांगला पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (IMD Weather Forecast)

शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता दिल्ली येथील मुख्यालयातून डॉ. महापात्रा यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधत ही माहिती दिली. महाराष्ट्रात जुलैमध्ये पाऊस कसा राहील या प्रश्नावर डॉ. महापात्रा म्हणाले, महाराष्ट्रात पाऊस सामान्यपेक्षा जास्त म्हणजे 100 ते 106 टक्के राहील. कारण 4 जुलैपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून तो मान्सून अधिक तीव्र करणार आहे. (IMD Weather Forecast)

जुलै महिन्यात मध्य भारतात चांगला पाऊस राहील. तो सामान्यपेक्षा जास्त राहून 100 ते 106 टक्के कोसळेल. पूर्वोत्तर भारतातही समान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल. मात्र उत्तर भारतात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सामान्यपेक्षा कमी राहील. शिवाय आसाम, मेघालय आणि कर्नाटकात सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. (IMD Weather Forecast)


पुणे (1जुलै 2023) | जुलै महिन्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. घाटमाथ्याच्या पूर्व-पश्चिम क्षेत्रात मुसळधार कोसळत आहे. सह्याद्री चढून आल्यावर सह्याद्रीच्या साधारण 200 किलोमीटर रुंदीच्या घाटमाथ्यावरील पूर्व-पश्चिम पट्ट्यातच म्हणजे महाराष्ट्राच्या त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, पोलादपूर, महाबळेश्वर, बावडा, राधानगरी आदी परिसरातच पाऊस पाडून मान्सूनची ताकद तेथेच संपून जात असल्याचे जाणवते.

मात्र त्यामुळे सह्याद्री घाटमाथा धरणक्षेत्र जलसंवर्धन करणाऱ्या नद्या वाहू लागल्या आहेत अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. सध्या मान्सून काळात सर्व मदत करणाऱ्या वातावरणीय प्रणालींचे अस्तित्व असूनही मान्सूनवर एल-निनोचा काहीसा प्रभाव जाणवत आहे. तरीही पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यताही असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईत पावसाने गुरुवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. शुक्रवारच्या पावसातही मुंबई उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या. शुक्रवारी सांताक्रूझ येथे 90.2 तर, कुलाबा येथे २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारीही मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २५ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने सरासरी गाठण्यासाठी मदत केली आहे. सांताक्रूझ येथे सहा दिवसांमध्ये सरासरीच्या ९६.७ टक्के पाऊस पडला. तर कुलाबा येथे ९३.९ टक्के पाऊस पडला. राज्यात मात्र परिस्थिती चिंताजनक असून जूनमधील सरासरी पर्जन्यमानात ५० टक्के तूट नोंदवली गेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular