पुणे | हवामान विभागाने (IMD Rain Alert) दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जात आहेत. याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे 19 ते 22 जुलै या काळात राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.
कोकण किनारपट्टीवर मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (IMD Rain Alert) आहे.
हवामान विभागाने 17 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला आणि 18 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ‘ऑरेंज अॅलर्ट’ दिला आहे. या काळात बहुतेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून घाट परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळणार आहे.
या भागात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सोलापूर, सातारा, नाशिक, नंदूरबार, ठाणे आणि पालघर हे जिल्हे वगळता अन्य सर्व जिल्ह्यात आज पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.