मुंबई | राज्यातील काही भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी राज्यातील अनेक भागामध्ये मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारल्यामुळे अनेक जिल्ह्यात पेरणी आणि शेतीकामे खोळंबल्याने शेतकरी चिंतेत आहेत. (IMD Rain Alert)
राज्यात पुढील 4-5 दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे. विदर्भात देखील पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. (IMD Rain Alert)
हवामान खात्याने आज विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. विदर्भात गेल्या दोन दिवसांपासूंन जोरदार पाऊस सुरू आहे. वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे, नाशिक आणि मुंबईत देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर या आठवड्यामध्ये मुंबई, उपनगर परिसरात पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.