मुंबई (30 जुन 2023) | हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज (IMD Rain Alert) वर्तवण्यात आला आहे. कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. पालघर जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह नाशिक, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
देशातील बहुतांशी भागात मान्सूनची प्रगती (IMD Rain Alert)
देशाचा बहुतांशी भाग मान्सूनने व्यापला असून देशात मॉन्सूनची चांगली प्रगती सुरू आहे. बुधवारी (ता. 28) संपूर्ण अरबी समुद्र तसेच राजस्थानच्या आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केली होती. तसेच मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत हरियाणा, पंजाबसह राजस्थानच्या उर्वरित भागासह संपूर्ण देशभरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार
बिपारजॉय चक्रीवादळामुळे थांबलेल्या मान्सूनची प्रगती झाल्याने 25 जून पासून महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस सुरू होण्याचा अंदाज वर्तवला होता. राज्यात मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पुणे, सांगली, सातारा या भागात जोरदार पाऊस 2 जूलै पर्यंत होणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यामध्ये 1 जूलै पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात 2 जुलै पासून चांगल्या पावसाला सुरूवात होणार आहे.
जुलै महिन्यातील पावसाचा विचार करता जुलै मध्ये पाऊसमान चागंले राहणार असून पहिले दोन आठवडे जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. राज्यात 15 जूलै पर्यंत खंड न पडता पाऊस सुरू राहणार असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपलेल्या असतील.
विदर्भाचा विचार करता पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये 2 जुलै ते 9 जुलै पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यंतरी आलेल्या बिपारजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनास अडथळा आल्याने मान्सून उशिरा दाखल झाला. चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यास थोडा उशीर लागली असली तरी आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.