मुंबई | गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्टही (IMD Rain Alert) देण्यात आला होता. हवामान विभागाने आजही राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे.
IMD Rain Alert – मुंबईच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रिय स्थिती, तसेच मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढील आठवडाभर राज्यात पावसाला पोषक स्थिती आहे. यामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे शहरात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
आज कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट
कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यासह पुण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असला तरी तिथेही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सांताक्रूज पाठोपाठ गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस
सांताक्रुज येथे 203 मिमी, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात 174 मिमी, रायगड जिल्ह्यातील महाड येथे 164 मिमी तर पेण येथे 145 मिमी, पालघर येथे 135 मिमी, नाशिक जिल्ह्यातील किनवट 138 मिमी इतका पाऊस झाला आहे.
विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 जखमी
गेल्या तीन चार दिवसांपासून विदर्भात (Vidharbha) जोरदार पाऊस सुरू आहे. मागील 48 तासात संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसात वीज पडल्याने सात जणांचा मृत्यू झाला असून एकाला भिंत कोसळल्याने जीव गमवावा लागला आहे. विदर्भात ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून त्यात वाहून गेलेल्या तिघांचा अद्याप शोध लागलेला नाही.
देशातील विविध राज्यात अतिवृष्टी
हवामान खात्याने आज देशातील विविध राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळच्या विविध भागात अतिपावसाची शक्यता वर्तवली आहे.
लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूह, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण-गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीच्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच बिहार, हरियाणा, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.