पुणे | महाराष्ट्रात 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यासह इतर काही भागात ढगांच्या गडगडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना सोमवार 17 जुलै 2023 साठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यात सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज (रविवार 16 जुलै 2023) हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासाठी पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात 16 ते 19 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे.
यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात जूनच्या शेवटी आगमन झाले. पण काही दिवसांतच मान्सून राज्यात पसरला. पावसाने जोर धरला. काही दिवस जोरदार पाऊस पडला. पण जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र वगळता मुंबई, ठाणे, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये पाऊस कमी झाला. पण आता अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.