पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Result 2023) उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागले होते.
पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे (25 मे) दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.
उद्या (25 मे) निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
‘या’ संकेतस्थळांवर तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलवर एका क्लिकवर निकाल पाहता येणार
1. mahresult.nic.in
2. https://hsc.mahresults.org.in
3. http://hscresult.mkcl.org
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?
फेब्रुवारी-मार्च 2023 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक राहिल. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.