आता तुमच्या मोबाईलवरही 5G नेटवर्क सुरू करा.. पण कसं? चला जाणून घेऊया सविस्तर

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी भारतात 5G नेटवर्क लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली. सध्या भारतातील मोजक्या शहरामध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनं आपल्या ग्राहकांना 5G नेटवर्क देऊ केलं आहे. मात्र, अजूनही अनेक युजर्सना आपल्या 5G एनएबल्ड फोनवर हे नेटवर्क कसं मिळवायचं याबद्दल फार माहिती नाही. चला तर आज आपण याबद्दल जाणून घेऊया

रिलायन्स जिओ आणि एअरटेलवर 5G सेवा कशी मिळवायची?

एअरटेल 5G नेटवर्क वापरण्‍यासाठी, तुमच्‍या स्‍मार्टफोन निर्मात्‍याकडून मेसेज मिळाल्यानंतर लेटेस्ट अपडेट इन्स्टॉल करा. 5G नेटवर्क उपलब्‍ध झाल्यावर तुमचा फोन आपोआप त्याला कनेक्ट होईल. सध्या, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, गुरुग्राम, गुवाहाटी, पानिपत, पुणे, नागपूर आणि वाराणसी या 12 शहरांमध्ये एअरटेल 5G नेटवर्क उपलब्ध आहे.

जिओची 5G सेवेची सध्या बीटा टेस्टिंग सुरू आहे. ही सेवा वापरण्यासाठी कंपनीकडून आमंत्रण आवश्यक आहे. तुम्हाला आमंत्रण मिळाल्यास, फोनमध्ये लेटेस्ट सॉफ्टवेअर व्हर्जन अपडेट करा. तुमच्या शहरात 5G सेवा उपलब्ध असल्यास फोन आपोआप जिओच्या 5G नेटवर्कशी कनेक्ट होईल. जिओवर 5G सेवा मिळवण्यासाठी 239 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्लॅन उपलब्ध आहेत. जिओने मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, वाराणसी, कोलकाता, पुणे, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, बेंगळुरू आणि फरीदाबाद या 12 शहरांमध्ये आपले 5G नेटवर्क आणलं आहे.

5G साठी अतिरिक्त शुल्क लागेला का?
आत्तापर्यंत भारतात 5G सेवा विनामूल्य आहेत. त्यामुळे, 5G वापरण्यासाठी तुम्हाला काहीही अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. फक्त 4जी नेटवर्क वापरण्यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे रिजार्च करता त्याप्रमाणे 5G वापरण्यासाठी रिचार्ज करावं लागेल. पोस्ट पेड युजर्सलासुद्धा कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही.

5G वापरल्यास जास्त डेटा लागेल का?
या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आणि नकारार्थी दोन्हीही आहे. 5G हे 4जी पेक्षा अधिक वेगवान असल्यानं, तुम्ही सर्वकाही जलदपणे डाउनलोड करू शकता. जर तुम्ही 4जी वापरत असताना जेवढा डेटा खर्च करत होता तेवढाच डेटा 5G वापरताना केला तर तुम्ही जास्त डेटा गमावणार नाही. पण, वेग जास्त असल्यामुळे तुम्‍ही डेटाचा अतिरेकी वापर सुरू केला तर डेटा लवकर संपेल. त्यामुळं डेटाचा खर्च तुमच्यावर वापरावर अवलंबून आहे.

5G वापरताना डेटा लगेच गायब होतो?
5G वापरताना डेटा काही मिनिटांत नाहीसा होतो कारण, 5G नेटवर्कमध्ये डेटाचा वेग जास्त असतो. डेटा ट्रान्सफर प्रक्रिया खूप जास्त वेगाने होते. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की डेटा काही मिनिटांत संपत आहे.

5G स्पीड टेस्टसाठी जास्त डेटा का वापरला जातो?
स्पीड टेस्टसाठी, अ‍ॅप्स मोठ्या डेटा पॅकचा वापर करतात. त्यामुळे आपोआप अधिक डेटा वापरला जातो. तुम्ही तुमच्या फोनवर 5G वापरता तेव्हा प्रत्येक वेळी स्पीड टेस्ट करणं टाळणं पाहिजे.

5G वापरताना डेटा कशा प्रकारे वाचवता येईल?
तुम्ही अ‍ॅप्समध्ये किंवा तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये डेटा सेव्हर सुरू करू शकता. तुम्ही तुमची डेटा मर्यादा ओलांडल्यास डेटा सेव्हर तुम्हाला अलर्ट करेल.

प्रत्येकासाठी 5G कधी उपलब्ध होईल?
पुढील दोन महिन्यांमध्ये 5G सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. जिओनं 2023च्या अखेरीस देशभरात 5G नेटवर्कचा विस्तार पूर्ण करण्याची अपेक्षा केली आहे. तर, एअरटेल मार्च 2023 पर्यंत 5G रोल आउट पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.

रोल आउट पूर्ण झाल्यानंतर 5G महाग होणार?
एकदा रोल आउट पूर्ण झाल्यानंतर 5G रिचार्ज प्लॅन्सची किंमत 4जी प्लॅनपेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ग्राहकांना जादा रक्कम देण्यासाठी आतापासूनच मनाची तयारी करावी.