मुंबई | इस्रोने 14 जुलै रोजी पृथ्वीचा उपग्रह अर्थात चंद्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी ‘चंद्रयान 3’ हे यान अवकाशात पाठवले. या यानाच्या यशस्वी उड्डाणानंतर ‘इस्रो’ विषयी लोकांमध्ये अधिक कुतूहल निर्माण झाले आहे. तेव्हा इस्रो म्हणजे काय? इथे नोकरीची संधी कशी मिळते? इत्यादी गोष्टी आज जाणून घेऊयात…
ISRO चे पूर्ण नाव भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) असे आहे. इस्रो ही भारत सरकारच्या अधिपत्याखालील अंतराळ संस्था आहे. या संस्थेची अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in अशी आहे. इस्रोचे मुख्यालय बंगलोर येथे असून राष्ट्रीय विकासासाठी अंतराळ विज्ञान आणि अवकाश संशोधनावर काम करणे हे इस्रोचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ISRO जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांपैकी एक मानली जाते.
ISRO मध्ये नोकरीसाठी आवश्यक पात्रता (ISRO Career)
इस्रोमध्ये नोकरीसाठी मूलभूत पात्रता बीई/बीटेक पदवी आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांना ‘इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट’ बोर्डाने घेतलेली परीक्षा द्यावी लागते. परीक्षेत लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश होतो. दोन्हीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना इस्रोमध्ये काम करण्याची संधी दिली जाते.
उमेदवाराच्या शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे त्याला इस्रो वैज्ञानिक पद किंवा इतर सरकारी पदाची नोकरी प्रदान करते. इस्रोमध्ये शास्त्रज्ञांसाठी अनेक पदे उपलब्ध आहेत. येथे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आणि स्पेस, मेकॅनिकल, संगणक विज्ञान, सिव्हिल, एअर कूलिंग आणि रेफ्रिजरेशन, आर्किटेक्चर यासारख्या विविध करिअर पर्यायातून उमेदवार आपले करिअर करू शकतात.
ISRO विविध विभागांसाठी शास्त्रज्ञांच्या भरतीसाठी अधिकृत पत्रक जाहीर करत असते. यासाठी इस्रोच्या वेबसाइटवर अर्ज जारी केला जातो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसोबत काम करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर चाचणीसाठी नोंदणी करू शकतात.
इस्त्रो मध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांची माहिती जाणून घेण्यासाठी ISRO CAREER या लिंकवर क्लिक करा.