कोरोनाची लस घेतलेल्यांना नवीन व्हेरियंटपासून किती संरक्षण मिळणार? तज्ञ काय सांगतात? वाचा | Alert : Corona is coming back

मुंबई | कोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असं जगभरातल्या सर्व तज्ज्ञांचं म्हणणं होतं. त्यामुळेच आपण युद्धपातळीवर लसीकरण केलं. पण तरीही कोरोना पुन्हा पुन्हा हल्ला (Alert : Corona is coming back) करतोय, असं दिसून येतयं. त्यामुळं लसीकरणाचा काही फायदा झाला का, असा प्रश्न अनेकांना सतावू लागलाय.

लसीकरणाचा खरंच काही फायदा होतो का याचं उत्तर कॉमनवेल्थ फंडने अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासातून समोर आलयं. युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड तसंच यॉर्क आणि येल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे की, जर लस उपलब्ध झाली नसती तर एकट्या अमेरिकेत दोन वर्षांत 12 कोटी पेक्षा जास्त लोकांना कोव्हिडची लागण झाली असती.

यातील जवळपास 1 कोटी 85 लाखांपेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं असतं, तर मृतांच्या संख्येत तब्बल 32 लाखांनी भर पडली असती. लसीकरण मोहिमेमुळे अमेरिकेने 1.3 ट्रिलियन डॉलर्स इतका वैद्यकीय खर्च वाचवलाय. हा अभ्यास अमेरिकेपुरता मर्यादित असला, तरीही यातून भारताने कोव्हिडवर कशी मात केली, याचा एक अंदाज लावता येतो.

आता सर्व पार्श्वभूमीवर कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने अनेकांना असा प्रश्न पडलाय की, जर मी लशीचे दोन्ही आणि पात्र असल्यास तिन्ही डोस घेतलेत, तर मी या नवीन व्हेरियंटपासून किती सुरक्षित आहे? लोकांना हा प्रश्न पडला असला तरी, तुम्ही घेतलेली लस BF.7 व्हेरिअंट ओमिक्रॉनवरही काम करेल, असंच तज्ज्ञांच सध्याच्या घडीचं मत आहे.

लसीपासून मिळणारं संरक्षण डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांपर्यंतच

लसीपासून मिळणारं संरक्षण डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांपर्यंतच मिळत असल्याचं अनेक अभ्यासांमधून समोर आलंय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशातल्या 90 टक्के लोकांनी कोव्हिडचे दोन्ही डोस घेतले आहेत तर फक्त 22.3 कोटी पात्र लोकांनी तिसरा अर्थात बूस्टर डोस घेतला आहे. हा आकडा फारच कमी आहे, आणि तो वर नेण्याची आणि स्वतःला आणखी सुरक्षित करण्याची जबाबदारी तुमच्या-आमच्यावरच आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला पॅनिक न होता, आपल्याला एकच काम करणे आहे – आवश्यक त्या कोव्हिड अनुरूप वर्तणुकीचं पालन करणं, आपलं लसीकरण पूर्ण करणं.