मुंबईनंतर पुण्यात हिट अँड रन\’; भरधाव वाहनाने पोलिसांना उडवले, एकाचा जागीच मृत्यु, एकजण गंभीर | Pune Hit And Run Case Police died
पुणे | मुंबईनंतर पुण्यात हिट अँड रनची घटना घडलीय. पुण्यातील खडकी- बोपोडी परिसरात एका अज्ञात भरधाव वाहनाने दोघा पोलिसांना उडवले. यामध्ये एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहेत. समाधान कोळी असं मृत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी आहेत. शिंदे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही बीट मार्शल कर्तव्यावर होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. पोलीस कर्मचारी संजोग शिंदे आणि समाधान कोळी हे दोघे खडकी पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. खडकी बाजार बीट मार्शल म्हणून ते रात्री कर्तव्यावर होते. सोमवारी (दि. 8)पहाटे पावणे दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला बोपोडी अंडरपास हॅरीस ब्रिज जवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिंदे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर वाहनाने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फरार वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.
मुंबई हिट अँड रनचा आरोपी अद्याप फरार, पोलीसांचा शोध सुरूच
मुंबईतील वरळी येथे (Worli Hit And Run) असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ काल सकाळी हिट अँड रनची घटना घडली. पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसने संपूर्ण देशाला हादरा दिला असतानाच मुंबईतील हिट अँड रन च्या घटनेनं सर्वाना हादरा दिला आहे. यात एका महिलेचा मृत्यु झाला. तर कार चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी कार चालक शिंदे गटाचा (Shinde Group) पालघरमधील उपनेता राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शहा असल्याचं समोर आलं आहे. सध्या मिहीर शहा (Mihir Shah) फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अपघाताप्रकरणी दीर्घ चौकशीनंतर वरळी पोलिसांनी राजेश शहा आणि अपघाताच्या वेळी कारमध्ये बसलेल्या राजर्षी बिदावार याला अटक केली आहे. मिहीर शाह अपघातानंतर अद्यापही फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर मिहीर त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचला होता. पोलिसांनी मिहीरच्या गर्लफ्रेंडची चौकशी केली आहे. मिहीर चालवत असलेल्या बीएमडब्ल्यू कारची दुचाकीवरील दांपत्याला धडक बसली आणि त्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर महिलेचा पती गंभीर जखमी आहे.