हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी, 122 जणांचा मृत्यू: रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच; दीडशेहून अधिक जखमी | Hathras Accident
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मोठी दुर्घटना (Hathras Accident) घडली आहे. याठिकाणी सुरू असलेल्या भोलेबाबा प्रवचन दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली असून यात शंभरापेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भास्कर वृत्तसमुहाच्या रिपोर्टरने सिकनारौ सीएचसी, हाथरसमध्ये मृतदेहांची मोजणी केली असता 122 पेक्षा अधिक जण मृत्यु झाल्याचे दिसून येत आहे. तर 27 जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवचन सुरू असताना शेकडो भाविक भीषण उष्णतेमुळे बेशुद्ध पडले. ही घटना सिकंदराराऊ कोतवाली भागातील फुलाई गावात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी पोहोचले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
यासंदर्भात बोलताना, हाथरसचे पोलीस अधिक्षक राजेश कुमार सिंह म्हणाले, आम्ही आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. यामध्ये 23 महिला, 3 लहान मुले आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात येत असून ही घटना नेमकी कशी घडली, यांसदर्भातील तपास सुरू आहे.