कोल्हापूर | राज्याच्या राजकारणातील उलथापालथीत नव्या राजकीय घडामोडीनंतर हसन मुश्रीफ (HasanMushrif) यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या नवीन राजकीय घडामोडीनंतर मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न करूनही त्यांना हे पद मिळाले नव्हते.
दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात मुश्रीफ (HasanMushrif) यांच्याकडे पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुश्रीफ यांच्याकडे याच मंत्रिपदाची जबाबदारी होती. राज्यात 2019 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यावेळी काँग्रेसचे जास्त आमदार असल्याने पालकमंत्री पदावर तत्कालिन मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी तर मुश्रीफ यांची नगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती.
यावेळी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी यात अदलाबदल केली, आणि थोरात यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवले. दरम्यान, मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना आपल्याला हे पद देण्याची विनंती केली होती. पण आघाडीच्या राजकारणात ते शक्य झाले नव्हते. आता मात्र हे पद त्यांच्याकडे आपसूक चालून येण्याची शक्यता आहे.
सध्याचे पालकमंत्री भाजपसाठी वेळ देत नाहीत. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामांना डावलले जाते. अनेक कार्यक्रमांत योग्य सन्मान राखला जात नाही. याचा परिणाम पक्षवाढीवर होत असल्याच्या तक्रारी भाजपने थेट राज्य नेतृत्वाकडेही केल्या आहेत. त्यामुळे वैतागलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री केसरकर यांच्या विरोधातच आंदोलन करण्याचा इशारा खुद्द पालकमंत्र्यांनाच विश्रामगृहावर दिला होता.
विशेष कार्यकारी अधिकार्यांच्या नियुक्त्यांबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना त्यात भाजपने पालकमंत्र्यांच्या कारभारावर निशाना साधत पालकमंत्री की पर्यटनमंत्री अशी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बदलाची जास्त शक्यता असून ती माळ मुश्रीफ यांच्याच गळ्यात पडेल, अशी चर्चा आहे.