हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी, घोटाळ्यांच्या आरोपावरून छापेमारी

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (कोल्हापूर) येथील घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. तसेच पुण्यातील कोंढवा येथील अशोका मुज सोसायटी आणि गणेशखिंड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहायला आहेत. तसेच, मुश्रीफ यांच्या कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

कागल शहरातील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाच वेळी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या घरांच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरू केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.  सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. आपासाहेब नलवडे कारखान्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ही छापेमारी सुरू आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणातील सर्व आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

हसून मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समजते. मुश्रिफांच्या घरावर छापा पडला असल्याचे समजतात मुस्लिम गटाच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर तसेच गैबी चौकात गर्दी केली.

पहाटे अंधार असतानाच दिल्ली पोलीस आणि ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांचे निवासस्थान विचारत निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण निवासस्थानाला वेढा दिला. कोणाला काही समजण्याची अगोदरच अधिकारी बंगल्यात गेले. बंगल्याच्या चारीबाजूने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेले सर्व पोलीस बंदूकधारी आहेत. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी अधिक आहेत.

प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानीदेखील चारीबाजूने बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. येथे कारवाई करण्यासाठी आलेले अधिकारी आणि पोलीस यांच्या गाड्यांचे दिल्ली पासिंग असल्याचे दिसून आले आहे.