मंत्री संजय शिरसाटांच्या लेकीचा महाप्रताप; सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन… Harshada Sanjay Shirsat
राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट (Harshada Sanjay Shirsat) यांनी यात आणखी भर घातलीय. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे सतत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तर आता त्यांची कन्या हर्षदा शिरसाट देखील अशाच चर्चेत आल्यात. महाराष्ट्र देशा या वेबपोर्टलने याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे.
हर्षदा शिरसाट यांच्या कृतीमुळं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कोणतेही पद नसताना हर्षदा यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पश्चिम मतदार संघातील गोलवाडी, तिसगाव आणि वडगाव परिसरातील सिडको (CIDCO) भागाची संबधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हर्षदा शिरसाट यांच्याकडून पाहणी
हर्षदा शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील गोलवाडी, तिसगाव आणि वडगाव परिसरातील सिडको भागाची संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. विशेष म्हणजे, हर्षदा शिरसाट यांच्याकडे कोणतेही अधिकृत पद नसतानाही त्यांनी सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतल्याचे समोर आले आहे. यावरून आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष असले तरी त्यांच्या अनुपस्थितीत कोणत्या अधिकारात सिडकोचे अधिकारी हर्षदा शिरसाट यांच्यासोबत पाहणी करत होते?
केलेला महाप्रताप ध्यानात येताच पोस्ट डिलीट
हर्षदा शिरसाट यांनी पाहणीबाबतची माहिती फेसबुक पोस्टद्वारे दिली होती. मात्र, वाद उफाळल्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. यामुळे सरकारी अधिकारी आणि वाहने मंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या सेवेसाठी वापरली जातात का? तसेच सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे अधिकारी कुठे असतात? असे सवाल उपस्थित होत आहेत.
सत्ताधारी विरुद्ध विरोधक संघर्ष तीव्र होणार?
राज्यात आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू असताना हर्षदा शिरसाट यांच्या या कृतीमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर सत्ताधारी आणि मंत्री संजय शिरसाट काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.